Kajol Talks About Daughter Nysa Devgan : बॉलीवूडमधील स्टारकिडबद्दल अनेकदा बोललं जातं. काही वेळा त्यांचं कौतुक होतं तर काही वेळा सेलिब्रिटींच्या मुलांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. अशातच आता काजोलनेही याबद्दल सांगितलं आहे. काजोलने तिची लेक निसाला दिसण्यावरून बोललं गेलं होतं याबद्दल सांगितलं आहे.
काजोल नेहमीच विविध गोष्टींबद्दलची तिची मतं, प्रतिक्रिया स्पष्टपणे मांडत असते. ती अनेकदा तिच्या खासगी आयुष्यातील अनुभवदेखील शेअर करत असते. काजोल अनेकदा मुलाखतींमधून तिच्या नवऱ्याबद्दल आणि मुलांबद्दल बोलताना दिसते. अशातच अभिनेत्रीने नुकतंच तिच्या लेकीबद्दल सांगितलं असून, तिच्या लेकीला निसा देवगणला तिच्या दिसण्यावरून खूप बोललं जायचं याबद्दल सांगितलं आहे.
काजोल व ट्विंकल सध्या त्यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. या कार्यक्रमात आतापर्यंत बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. अशातच या कार्यक्रमाच्या नवीन भागात करण जोहर व जान्हवी कपूर यांनी हजेरी लावली. यावेळी काजोलने तिच्या लेकीबद्दल निसाबद्दल सांगितलं. त्यानंतर जान्हवी कपूरनेही तिला आलेल्या काही अनुभवांबद्दल सांगितलं.
काजोलची लेक निसाबद्दल प्रतिक्रिया
कार्यक्रमात काजोल म्हणाली, “मला आठवतंय जेव्हा निसा लहान होती तेव्हा खूप काही चुकीचं आणि नको नको ते तिच्याबद्दल बोललं गेलं. हे पापाराझी आणि सोशल मीडियावरील लोक तिच्याबद्दल खूप काही बोलायचे. तिच्या फोटोंखाली कमेंट्स करायचे, ज्यामुळे तिला खूप वाईट वाटयचं. पण, मुलं ही मुलं असतात आणि प्रत्येक मूल क्युटच असतं. हां, असं असू शकतं की कधी त्यांचा हेअर कट नीट नसेल किंवा कधी त्यांनी फॅशनेबल कपडे घातले नसतील. पण, मला आठवतंय यामुळे एकदा तिला खूप वाईट वाटलेलं आणि निसाच नाही तर माझा मुलगा युगलाही या गोष्टीला सामोरं जावं लागलं.”
काजोलच्या या मुद्द्यावर जान्हवी कपूरही तिचा अनुभव सांगत म्हणाली, “माझ्याबाबतीतही असं घडलं आहे. माझ्या आई-बाबांना सोशल मीडियाबद्दल फार काही माहिती नव्हतं. पण, माझी आई याबद्दल खूप कडक शिस्तीची होती. तिला मी अभिनेत्री होऊ नये असं वाटत होतं. तेव्हा नुकतंच हे सोशल मीडया वगैरे गोष्टी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या होत्या आणि लोक खूप सहज एकमेकांबद्दल बोलायचे, टीका करायचे. माझ्यासाठी सुरुवातीला हे सगळं खूप कठीण गेलं.”
जान्हवी पुढे म्हणाली, “मला असं वाटतं, मीच स्वत:ला खूप ट्रोल केलं आहे. मला वाटतं मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटाच्यावेळी आम्हाला असं सांगण्यात आलेलं की जितक्या प्रतिक्रिया तुम्ही द्याल तितका जास्तवेळ तुम्ही स्क्रीनवर दिसाल. मग आम्ही जेव्हा क्रिकेट मॅच पाहायला गेलो होतो, तेव्हा खरंतर फिल्डवर असं काही घडत नसतानाही मी उगाच प्रतिक्रिया देत होते आणि सगळं स्क्रीनवर दाखवलंही जात होतं.”
