Kareena Kapoor : बॉलिवूडला जेव्हा हिंदी चित्रपट सृष्टी असं म्हटलं जायचं तेव्हापासून कपूर हे घराणं हिंदी चित्रपट सृष्टीला ठाऊक आहे. करीना कपूर ही याच कपूर घराण्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवताना दिसते आहे. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर यांच्या नंतरच्या पिढीतली ही तारका. करीश्मा कपूर आणि करीना कपूर या दोघीही रणधीर कपूर यांच्या मुली. रणबीर कपूरच्या चुलत बहिणी. करीनाचा पहिला चित्रपट आला तो २००० मध्ये. ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून तिने पदार्पण केलं. त्यानंतर मागची २५ वर्षे करीना कपूर (Kareena Kapoor ) बॉलिवूडमध्ये तिची कारकीर्द गाजवते आहे.
स्वतःच्या कारकिर्दीबाबत करीनाचं मत काय?
करीनाने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रेफ्युजी हा अभिषेक बच्चनसह केलेला तिचा चित्रपट फारसा चालला नाही. पण नंतर आलेल्या विविध चित्रपटांनी तिला ओळख तर दिलीच पण तिला स्टारही केलं. ती स्टार किड असली तरीही तिला तिची ओळख तयार करावी लागली. तिला स्टारपद सहजासहजी मिळालं नाही. करीना कपूरने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं की तिच्या कारकिर्दीकडे ती नजर टाकते तेव्हा तिला दिसतो तो त्यामागे असलेला तिचा आत्मविश्वास. करीना कपूर ( Kareena Kapoor ) म्हणते माझा आत्मविश्वासच मला पुढे घेऊन गेला.

कहो ना प्यार है असता करीनाचा पहिला चित्रपट
खरंतर रेफ्युजी नाही तर कहो ना प्यार है हा चित्रपट करीनाचा ( Kareena Kapoor ) पहिला चित्रपट ठरला असता. ऋतिक रोशन आणि करीना यांचे काही सीनही शूट झाले होते. पण अचानक करीनाने या चित्रपटातून एक्झिट घेतली. हा चित्रपट आमीषा पटेलला मिळाला आणि बॉलिवूडला अमीषा पटेल ही अभिनेत्री मिळाली. करीना कपूरच्या कारकिर्दीला अनेक पैलू आहेत यात काही शंका नाही. तिच्या व्यक्तिगत आयुष्यात आणि रिलच्या आयुष्यात विविध गोष्टी घडल्या पण ती समर्थपणे त्यांना सामोरी गेली. करीनाचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने आपण जाणून घेऊ करीनाबाबत असे काही किस्से जे आपल्याला माहीत नाहीत.
जे काम करता त्यावर तुमचं प्रेम हवंच-करीना
तुम्ही जे काम करताय त्यावर तुमचं प्रेम हवं तर तुम्ही ते आनंदाने करु शकता. अभिनय हे भुतासारखं असतं. मी कॅमेराला सामोरी गेले नव्हते तेव्हापासून मी हे मानत आली आहे. मी माझ्या सगळ्याच चित्रपटांमध्ये २०० टक्के प्रामाणिकपणे काम केलं आहे. पण काही चित्रपट असे आहेत ज्यांना म्हणावं तसं यश आलं नाही. ‘टशन’, ‘हिरॉईन’, ‘लाल सिंग चढ्ढा’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. मला बऱ्याच अपेक्षा होत्या. असं म्हणत करीनाने ( Kareena Kapoor ) खंतही व्यक्त केली होती.

करीना कपूर आणि शाहीद कपूर यांच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा
करीना कपूर ( Kareena Kapoor ) आणि शाहीद कपूर या दोघांच्या अफेअरच्या चर्चाही बऱ्याच रंगल्या होत्या. या दोघांचा एक व्हिडीओही लीक झाला होता. त्यावरुन बरीच टीका झाली होती. त्यामुळे करीना कपूर आणि व्यक्तिगत आयुष्यातले वाद हे काही नवं नाही. करीना आणि शाहीद कपूर या दोघांच्या नात्याबाबत अनेक बातम्या येत होत्या. मात्र नंतर या दोघांचं ब्रेक अप झालं. या दोघांच्या ब्रेक अप नंतर आलेला ‘जब वी मेट’ हा चित्रपट बराच चालला. त्यातल्या बिनधास्त ‘गीत’ने पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घातली. गीत हे करीनाने साकारलेलं असं पात्र आहे की त्याला अनेक छटा आहेत. काहीशी बंडखोर, चुलबुली प्रेमात नाकारलं गेलेल्या शाहिदला खास फंडे देणारी, त्यानंतर स्वतःला आलेला अनुभव आणि मग अगदी मॅच्युअर्ड वागणारी. अशा सगळ्या छटा तिने उत्तम वठवल्या आहेत. शाहिद आणि करीनाचं ब्रेक अप झालं आणि नंतर तिच्या आयुष्यात आला सैफ अली खान. सैफशी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर तर करीनावर लव्ह जिहादचेही आरोप झाले.
करीना आणि सैफचं लग्न आणि लव्ह जिहादचे आरोप
करीना कपूर ( Kareena Kapoor ) आणि सैफ अली खान यांची ओळख ‘टशन’ या यशराजच्या चित्रपटादरम्यान झाली. या दोघांचं प्रेम फुललं आणि आपण आता सात जन्मांचे जोडीदार होऊ शकतो असं दोघांना वाटलं त्यामुळे दोघांचा विवाह झाला. मात्र सैफ अली खान मुस्लीम असल्याने करीना कपूरवर त्या वेळी लव्ह जिहादचेही आरोप झाले. त्या आरोपांना करीना संयतपणे सामोरी गेली. या दोघांना तैमूर आणि जेह अशी मुलं आहेत. त्यातल्या तैमूरच्या नावावरुनही तिच्यावर आणि सैफ अली खानवर खूप टीका झाली. अजूनही सोशल मीडियावर करीनाला त्यासाठी ट्रोलिंग सहन करावं लागतं पण करीनाने तिचा तोल ढळू दिला नाही. स्पष्टीकरण दिलं नाही, आरोपांच्या फैरी उडूनही करीना कपूर ( Kareena Kapoor ) शांत राहिली.

झीरो फिगरचा ट्रेंड आणि टीका
करीनाने ( Kareena Kapoor ) ‘टशन’ सिनेमाच्या वेळी झीरो फिगरचा ट्रेंड आणला आणि तो सेटही केला. यावरुन त्या सिनेमातल्या बिकीनी दृश्यांवरुनही तिला टीकेला सामोरं जावं लागलं. पण जे करायचं ते पॅशनेटली करायचं हे म्हणणाऱ्या करीनाने तिचं काम परफेक्ट केलं. त्यानंतर अनेक जणींनी हा ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न केला. पण करीनाला जे जमलं ते सगळ्यांना जमलंच असं नाही. एवढंच काय करीनाने गरोदर असताना वाढवलेलं वजन आणि त्यानंतर कमी केलेलं वजन त्यासाठीचं डाएट हा देखील चर्चेचा विषय ठरला.

करीनाच्या कारकिर्दीचा आलेख चढ उतार करणारा
अनेक चित्रपटांमधून करीनाच्या ( Kareena Kapoor ) अभिनयाचं कौतुक झालं. २००४ मध्ये आलेल्या ‘चमेली’ या सुधीर मिश्रा दिग्दर्शित ऑफबीट सिनेमात करीना शरीरविक्रय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत होती. त्या चित्रपटातल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्याचप्रमाणे आमिर खान, राणी मुखर्जीसह केलेल्या ‘तलाश’ चित्रपटातही करीना ज्या आत्मविश्वासाने वावरली त्याला तोड नाही. डॉन, हल्ला बोल, गोलमाल रिटर्न्स, बिल्लू, कुर्बान, ओमकारा बॉडीगार्ड, एजंट विनोद, हिरॉईन, सत्याग्रह, सिंघम रिटर्न्स, की अँड का, उडता पंजाब, लाल सिंग चढ्ढा, क्रू, द बकिंगहॅम मर्डर्स, वीरे दी वेडिंग, थ्री इडियट्स, जाने जाँ, अशा अनेक चित्रपटांमधून तिने तिच्या अभिनयाचे पैलू दाखवले. यातले काही चित्रपट हे नक्कीच लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. खास करुन जाने जाँ मधला तिचा अभिनय लोकांना खूपच आवडला. ‘ओमकारा’ या चित्रपटातही ती होतीच. तिच्या खास लुकने पडद्यावर जादू केली होती. शेवटी तिचं जे काही होतं ते पाहूनही लोक हळहळले होते. त्याचप्रमाणे ‘वीरे दी वेडिंग’मध्येही ती बोल्ड विषयावरच्या चित्रपटात दिसली होती. तिच्या कारकिर्दीचा आलेख चढ उतार करणारा ठरला. पण आपलं स्थान स्टार म्हणून बळकट करण्यात ती यशस्वी झाली हे मान्य करावं लागेल.

सैफवरचा हल्ला आणि करीना कपूरची भूमिका
याच वर्षी जानेवारी महिन्याच्या १६ तारखेला सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर करीना कपूरने ( Kareena Kapoor ) सैफ अली खान आणि तिचं कुटुंब ज्या प्रकारे सांभाळलं त्याचंही कौतुक झालं. करीना कपूर ही कपूर घराण्याचा वारसा पुढे चालवते आहे. तैमूर आणि जेहलाही सांभाळते आहे. शिवाय तिने जे काही २५ वर्षात सहन केलं ते सहन करायला आत्मबळच हवं. ज्याचं बाळकडू तिला घरातूनच मिळालं असावं. करीनाच्या एकूण कारकिर्दीकडे आणि व्यक्तिगत आयुष्याकडे पाहिलं तर हे कळतं की करीना होणं सोपं नाही.