Karisma Kapoor Birthday : ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूरला ओळखलं जातं. आजवर तिने ‘कुली नंबर वन’, ‘बीवी नंबर वन’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. १९९१ पासून करिश्माने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘प्रेम कैदी’ चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. आज करिश्मा तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिची लहान बहीण व बॉलीवूडच्या बेबोने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कपूर कुटुंबीयांसाठी यंदाचं वर्ष आतापर्यंत फार अडचणींचं होतं, असं करीनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सैफ अली खानवर राहत्या घरी झालेला चाकू हल्ला, याशिवाय अलीकडेच करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली. या कठीण काळात करिश्मा व करीना या दोन्ही बहिणींनी एकमेकींना खंबीर साथ दिल्याचं पाहायला मिळालं. आज बहिणीच्या वाढदिवसानिमित्त करीनाने पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

करीनाने करिश्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो फार जुना असून, यामध्ये करिश्मा व सैफ अली खानची झलक पाहायला मिळत आहे.

करीना भावना व्यक्त करत लिहिते, “मला तुम्हा दोघांचा हा फोटो खूप जास्त आवडतो…( करिश्मा कपूर व सैफ अली खानचा फोटो ) ही पोस्ट आहे या जगातील सगळ्यात खंबीर आणि बेस्ट मुलीसाठी… आम्हा दोघींसाठी यंदाचं हे वर्ष आतापर्यंत खूप कठीण गेलं. पण, तुम्हाला माहितीये का? असं म्हणतात कठीण काळ जास्त वेळ टिकत नाही आणि या कठीण काळात बहिणीच एकमेकींना साथ देतात. मला आईप्रमाणे साथ देणाऱ्या माझ्या बहिणीला, माझ्या जिवलग मैत्रिणीला…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! Happy birthday My Lolo”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, करीनाने करिश्मासाठी शेअर केलेल्या पोस्टवर आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर, मलायका अरोरा अशा अनेक बॉलीवूड कलाकारांनी खास कमेंट्स करत अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.