Randhir Kapoor once said we dont need Sunjay Kapurs money: बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचे १२ जूनला निधन झाले. संजय कपूर हे प्रसिद्ध उद्योगपती होते. संजय कपूरच्या अकाली निधनामुळे व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला.
करिश्मा कपूर व अभिषेक बच्चन हे रिलेशनशिपमध्ये होते, त्या वेळी २००२ मध्ये त्यांचा साखरपुडादेखील पार पडला होता. मात्र, त्यानंतर काही काळातच अभिषेक बच्चन व करिश्मा कपूर वेगळे झाले. त्यांनी त्यांचा साखरपुडा मोडला. त्यानंतर करिश्मा कपूरने उद्योगपती संजय कपूरबरोबर लग्नगाठ बांधली होती. मात्र, काही वर्षातच ते वेगळे झाले. घटस्फोटावेळी करिश्मा कपूर व संजय कपूर यांनी एकमेकांवर अनेक आरोप केले होते.
एकदा संजय कपूर करिश्मावर आरोप करत म्हणालेला की, तिने फक्त त्याच्याशी पैशांसाठी लग्न केले. त्यावर करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी त्यांना कोणाच्या पैशांची गरज नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. तसेच संजय कपूरवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.
रणधीर कपूर काय म्हणालेले?
२०१६ मध्ये हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रणधीर कपूर म्हणालेले, “आम्ही कपूर घराण्यातील आहोत हे सर्वांनाच माहीत आहे. आम्हाला कोणाच्या पैशांमागे धावण्याची गरज नाही. देवाच्या कृपेने आमच्याकडे पैसे तर आहेतच, पण आमच्याकडे प्रतिभादेखील आहे; ती प्रतिभा आम्हाला आयुष्यभर साथ देईल.”
रणधीर कपूर यांचा करिश्मा व संजय यांच्या लग्नाला विरोध होता, असा खुलासादेखील त्यांनी केला होता. ते म्हणालेले, “करिश्माचे संजय कपूरबरोबर लग्न व्हावे, असे मला कधीच वाटले नाही. त्याने कधीच तिची काळजी घेतली नाही. करिश्माबरोबर लग्न केलेले असताना तो दुसऱ्या एका महिलेबरोबर राहत होता. संपूर्ण दिल्लीला माहीत आहे की तो कसा आहे. याच्यावर मला याहून अधिक काहीही बोलायचे नाही.”
फोर्ब्सनुसार, संजय कपूर यांची १.२ बिलियन डॉलर म्हणजेच १०, ३०० कोटींची संपत्ती आहे. २०१५ साली संजय कपूरचे वडील सुरिंदर कपूर यांच्या निधनानंतर सोना कॉमस्टार या कंपनीची धुरा त्यांच्या हातात आली. ब्लूमबर्गच्या मते, सोना कॉमस्टार कंपनीचे बाजारमूल्य तब्बल ३१ हजार कोटी (४ अब्ज डॉलर्स) इतके आहे.
दरम्यान, करिश्मा व संजय यांचा २०१६ साली घटस्फोट झाला. डेली न्यूज अँड अॅनालिसिस (DNA) नुसार, संजय कपूर यांनी ७० कोटींची पोटगी करिश्माला दिली होती. २०१६ च्या एएनआय रिपोर्टनुसार, संजयने त्याच्या दोन मुलांसाठी १४ कोटींचे बॉण्ड खरेदी केले होते, त्यावर वार्षिक व्याज हे १० लाख इतके होते.