अभिनेत्री क्षिती जोगनं आजवर मालिका, नाटक, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेतील चित्रपट आणि नाटकांमध्येही क्षितीनं काम केलं आहे. अभिनयासह क्षितीनं निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलंय. क्षिती ही तिचा नवरा दिग्दर्शक हेमंत ढोमेसह चित्रपटांची निर्मिती करते. दोघांनी एकत्र, ‘सन्नी’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. क्षितीने निर्मितीची जबाबदारी पार पाडली; तर हेमंतने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.

क्षिती व हेमत यांच्या सर्वच चित्रपटांना आजवर प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. परंतु, ‘झिम्मा’ या चित्रपटानं मात्र विशेष लक्ष वेधलं. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं चांगली कमाई केली. अशातच क्षितीनं या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. क्षितीनं सुलेखा तळवलकरला नुकतीच मुलाखत दिली. त्यामध्ये तिनं ‘झिम्मा’ला मिळालेलं यश पाहून तिच्या हिंदी सहकलाकारांनी तिचं भरभरून कौतुक केल्याचं सांगितलं आहे.

सुलेखा तळवलकरला दिलेल्या मुलाखतीत क्षिती म्हणाली, ” ‘झिम्मा’ प्रदर्शित झाला तेव्हा मी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं चित्रीकरण करीत होते. तेव्हा ‘झिम्मा’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. तर ‘झिम्मा’ हिट झाल्यानतंर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या सेटवर माझं कौतुक करण्यात आलं. रणवीर सिंहनं तर ‘झिम्मा’ हिट झाला म्हणून सगळ्यांना पेढेसुद्धा वाटले.”

पुढे या चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलताना ती म्हणाली, “सेटवर सर्व जण खूप चांगले होते. करण जोहर दिग्दर्शक म्हणून खूप कमाल माणूस आहे. या चित्रपटामुळे मला दिग्गज कलाकारांबरोबर काम करता आलं. धर्मेंद्र, जया बच्चन, रणवीर सिंह, आलिया भट्ट या सर्व कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी पर्वणी होती.”

पुढे क्षितीनं हिंदी कलाकारांबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली, “हिंदीमध्ये जर मराठी कलाकार काम करीत असतील, तर त्यांना खूप आदर दिला जातो. मराठी कलाकार कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय असल्यानं ही गोष्ट त्यांना खूप आवडते. तसेच सेटवरील सगळेच मराठी कलाकारांचा खूप आदर करतात, त्यांना चांगली वागणूक देतात. त्यामुळे मला हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांत काम करताना कसलंच दडपण जाणवत नाही. तिन्ही भाषांतील तिन्ही माध्यमांमध्ये मी आनंदानं काम करते.”