Madhuri Dixit Dance Video : बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. याठिकाणी विविध शहरांमध्ये माधुरीचे विशेष कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत. कॅनडात पार पडलेल्या शोमध्ये माधुरीला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कॅनडामधील शोसाठी माधुरी जवळपास ३ तास उशिरा पोहोचल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, धकधक गर्लला स्टेजवर एन्ट्री घेताना पाहताच सर्वांनी एकच जल्लोष केला.

माधुरीने यावेळी तिच्या बऱ्याच सुपरहिट गाण्यांवर परफॉर्मन्स सादर केला. माधुरीने ‘अबोध’ चित्रपटातून पदार्पण केलं असलं तरीही, तिला खरी ओळख ‘तेजाब’मुळे मिळाली. ‘तेजाब’मधलं प्रत्येक गाणं सोशल मीडियावर सुपरहिट ठरलं होतं. यापैकी ‘एक दो तीन…’ हे एव्हरग्रीन गाणं आजही प्रचंड लोकप्रिय आहे. प्रत्येक समारंभात हे गाणं वाजवलं जातं. माधुरीने या ३७ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर पुन्हा एकदा जबरदस्त डान्स केला आहे.

माधुरीने ‘तेजाब’ सिनेमातील ‘एक दोन तीन…’ गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. धकधक गर्लने यावेळी मजंठा रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला होता. विशेष म्हणजे या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना माधुरीचे एक्स्प्रेशन्स अगदी लक्ष वेधून घेणारे होते. यावेळी अभिनेत्रीने तिच्या गाजलेल्या गाण्यांच्या हूकस्टेप्स करून दाखवल्या.

माधुरीच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या वयात देखील तिचा फिटनेस थक्क करणारा आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसह नेटकऱ्यांनी सुद्धा या ‘धकधक गर्ल’चं कौतुक केलं आहे.

दरम्यान, या शोच्या एक दिवस आधी अभिनेत्री आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह न्यूयॉर्कमधील शेफ विकास खन्नाच्या रेस्टॉरंटमध्ये डिनर करण्यासाठी पोहोचली होती. यावेळी विकासने मोठ्या प्रेमाने नेने कुटुंबीयांची स्वागत केलं आणि त्यांना चविष्ट पदार्थ खाऊ घातले. याशिवाय माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती ‘मिसेस देशपांडे’ या सीरिजमध्ये झळकणार आहे. लवकरच या प्रोजेक्टची रिलीज डेट जाहीर करण्यात येईल.