Madhuri Dixit Dance Video & Home Tour : बॉलीवूडची स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या दिलखेचक अदांनी कायमच चाहत्यांना भुरळ घालते. माधुरीच्या नृत्यशैलीचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वीच ‘धकधक गर्ल’ संजू राठोडच्या व्हायरल शेकी गाण्यावर थिरकली होती. आता अभिनेत्रीने राहत्या घरी जुन्या गाण्यावर सुंदर डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

१९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शराबी’ सिनेमातील ‘इन्तेहाँ हो गई’ या गाण्यातील शेवटचं कडवं गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याच गाण्यावर माधुरीने ठेका धरल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलं आहे. विशेष म्हणजे माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्या राहत्या घराची संपूर्ण झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

माधुरीचं आलिशान घर मुंबईत ५३ व्या मजल्यावर आहे. धकधक गर्लने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला सुंदर पेटिंग्ज पाहायला मिळत आहेत. या पेंटिंग्ज लोकप्रिय व जागतिक दर्जाचे चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या आहेत. ते माधुरीचे डाय हार्ड फॅन होते.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला बॅकग्राऊंडला पारंपरिक नृत्य करणाऱ्या महिलांचं सुंदर पेंटिंग पाहायला मिळत आहे. हे एम.एफ. हुसेन यांचं १९९५ मधील पेंटिंग असून ते ४४ x ५५ इंचाच्या कॅनव्हासवर रेखाटण्यात आलं आहे.

माधुरीच्या या व्हिडीओवर प्रीती झिंटा, दिग्दर्शक सुभाष घई यांनी खास कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये तिच्या आलिशान घराचं भरभरून कौतुक केलं आहे.

Madhuri Dixit
Madhuri Dixit

दरम्यान, माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर तिने गेल्यावर्षी ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. आता माधुरी लवकरच ‘मिसेस देशपांडे’ या सायकोलॉजिकल थ्रिलर प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. अद्याप या सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.