Madhuri Dixit Faces Backlash For Arriving 3 Hours Late At Canada Tour : माधुरी दीक्षित बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. माधुरीनं ९० च्या दशकात अनेक चित्रपटांत काम करीत तिच्या सहजसुंदर अभिनय, सौंदर्य आणि हटके अंदाजानं मोठ्या प्रमाणात प्रेक्षकपसंती मिळवली. त्यामुळे माधुरीचा चाहतावर्ग मोठा आहे आणि आजही तिची क्रेझ कायम आहे. सध्या माधुरी तिच्या कॅनडा व यूएसएमधील टूरमुळे चर्चेत आहे. परंतु, या टूरच्या वेळी तिच्यावर भरभरून प्रेम करणारे तिचे चाहते मात्र नाराज झाल्याचं दिसतं.
माधुरी दीक्षितच्या चाहत्यांसाठी खास शोचं आयोजन करण्यात आलं आहे. २ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा शो १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. माधुरीनं काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत याबद्दलची माहिती दिलेली. यावेळी तिनं “मी खूप उत्सुक आहे. मी लवकरच माझ्या आगामी अमेरिका आणि कॅनडा टूरची घोषणा करणार आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला भेटायला आणि नृत्य, संगीत व आठवणींनी भरलेला एक अविस्मरणीय अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवायला मी आतुर आहे,” अशी कॅप्शन दिली आहे.
नेमकं काय घडलं?
माधुरीच्या या टूरमधील पहिला कार्यक्रम २ नोव्हेंबरला कॅनडा येथे पार पडला. परंतु, यामुळे तिचे चाहते फार आनंदी नसल्याचं समोर आलं. एवढंच काय तर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचंही पाहायला मिळतं. यावेळी माधुरी पूर्ण तीन तास कार्यक्रमात उशिरा पोहोचल्यानं कार्यक्रमात हजेरी लावलेल्या लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी या संदर्भात पोस्टही केली आहे.
माधुरी दीक्षितच्या या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या एका चाहत्यानं इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमातील माधुरीचा व्हिडीओ पोस्ट करीत त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर या व्हिडीओखालीही कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या असून, बहुतांश लोकांनी नाराजी व्यक्त केल्याचं दिसतं. माधुरीच्या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या एका व्यक्तीनं व्हिडीओ पोस्ट करीत त्यावर “जर मी तुम्हाला कुठला सल्ला देऊ शकत असेन, तर माधुरी दीक्षित टूर या कार्यक्रमाला जाऊ नका. तुमचे पैसे वाचवा”, असं लिहिलं आहे.
माधुरी दीक्षितवर चाहते नाराज
या व्हिडीओखाली एकानं “आजवरचा खूप वाईट शो आहे, प्रेक्षकांच्या वेळेची किंमत नाही आणि तीन तास उशिरा येऊन निरर्थक गप्पा-गोष्टी झाल्या. हा आतापर्यंतचा अत्यंत वाईट पद्धतीनं नियोजन केलेला शो होता,” अशी कमेंट केली. दुसऱ्यानं, “जाहिरातीत ती फक्त दोन सेकंद गाण्यांवर नृत्य करणार आणि गप्पा मारणार, असं नमूद केलं गेलं नव्हतं. आयोजकांनी खूप वाईट पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन केलं. कितीतरी लोक अर्ध्यातच निघून गेले. लोक त्यांचे पैसे परत करा, असं म्हणत होते. ती कितीही सुंदर नर्तिका व अभिनेत्री असली तरी या कार्यक्रमाला उपस्थिती असलेली प्रत्येक व्यक्ती हे मान्य करील की, या कार्यक्रमाचं नियोजन खूपच वाईट पद्धतीनं करण्यात आलेलं,” असं म्हटलं. त्यासह अजून एकानं ‘माझा या कार्यक्रमाचा अनुभव खूप वाईट होता. ते लोक फक्त माधुरी दीक्षितच्या नावावर तिकिटं विकत आहेत. मी तर हा विचार करीत आहे की, तिच्यासारख्या इतक्या चांगल्या कलाकारानं अशा प्रकारच्या कार्यक्रमाला होकार का दिला?”
