बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आणि अभिनेते अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘पुकार’ चित्रपटाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुकार’ सिनेमाचं नाव जरी घेतलं तरी माधुरी आणि प्रभुदेवा यांचा ‘हे के सेरा सेरा’ गाण्यावरचा जबरदस्त डान्स डोळ्यासमोर उभा राहतो. या सिनेमात आणखी एका गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं ते म्हणजे ‘किस्मत से तुम हमको मिले’. हे गाणं बर्फाळ प्रदेशात शूट करण्यात आलं आहे. स्क्रिप्टनुसार माधुरीला बर्फाळ प्रदेशात शिफॉन साडी नेसून या गाण्यासाठी शूट करायचं होतं. या दरम्यान अभिनेत्रीची अवस्था फार बिकट झाली होती. याचा अनुभव ‘धकधक गर्ल’ने स्वत: एका मुलाखतीत सांगितला होता.

‘पुकार’मधलं ‘किस्मत से तुम’ हे गाणं अलास्कामध्ये शूट करण्यात आलं आहे. यादरम्यानचा अनुभव माधुरीने ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. कलाकारांना गाण्यावर लिप-सिंक कराव्या लागतात, थंड वातावरणात लिप-सिंक करणं काहीसं कठीण जातं. त्यात माधुरी हे गाणं हिमनदीवर शूट करत होती. अभिनेत्रीने गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान निळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली होती. तर, अनिल कपूर यांनी टी-शर्ट आणि त्यावर कोट घातला होता. परिणामी, प्रचंड थंडीमुळे माधुरीला या गाण्याच्या शूटिंगदरम्यान सुरुवातीला अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

माधुरी म्हणते, “संध्याकाळी आमचं शूट सुरू झालं तेव्हा पहिल्या दिवशी मी ते शूट पूर्ण करू शकले नाही. कारण, आम्ही त्या भागात दुपारी पोहोचलो होतो आणि कालांतराने त्या हिमनद्यांवर खूप थंडी पडू लागली होती. संध्याकाळचे ४ ते ४.३० वाजले असतील. फराह खान कोरिओग्राफर होती. ती म्हणत होती, ‘गाणं गा…’ माझं असं झाली की, ‘मी गाणं गातेय’ पण, माझे ओठ हलतच नव्हते, कारण थंडीमुळे मला लिंप-सिंक करता येत नव्हतं.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “सेटवर डॉक्टर सुद्धा होते, कारण त्याठिकाणी खूप थंडी वाजत होती. माझे ओठ निळे झाले होते. त्यामुळे पॅकअप करण्यात आलं. पहिल्या दिवसाचं शूटिंग थांबवण्यात आलं, दिवस वाईट गेला. दुसऱ्या दिवशी त्या थंडीची काहीशी सवय आम्हाला झाली होती, त्यामुळे थोडं जुळवून घेता आलं. त्यासाठी कसे कपडे घालायचे हे आम्हाला माहिती होतं. शिफॉन साडीत शूट असल्याने मी जास्त काही काळजी घेऊ शकले नाही. पण, शूट झाल्यावर उबदार कसं राहता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केले. सेटवर चादर घेऊन एक व्यक्ती उभी असायची, सीन संपला की, मी चादर ओढून बसायचे. यामुळे काही वेळ मला बरं वाटायचं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Madhuri Dixit
माधुरी दीक्षितची पोस्ट ( Madhuri Dixit )

दरम्यान, आज या ‘पुकार’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने माधुरीने पुन्हा एकदा संपूर्ण टीमचे इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आभार मानले आहेत. ‘पुकार’ हा राजकुमार संतोषी यांनी सह-लेखन आणि दिग्दर्शन केलेला अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट होता. यात माधुरी अनिल कपूर यांच्यासह नम्रता शिरोडकर, डॅनी डेन्झोंगपा, शिवाजी साटम आणि ओम पुरी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.