Madhuri Dixit Once Refused To Do A Scene : माधुरी दीक्षित बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ९०च्या काळात तिने अनेक चित्रपटांत काम करत तिच्या सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने अनेकांची मनं जिंकली. आजही तिची क्रेझ कायम आहे. त्यावेळी तिने अनेक चित्रपटांत काम केलेलं. परंतु, तुम्हाला माहीत आहे का एकदा माधुरीला दिग्दर्शकाने चित्रपटातून काढण्याची धमकी दिलेली.
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार माधुरी दीक्षित त्या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांच्या कारकिर्दीची सुरुवात थोडी खडतर झाली होती. सुरुवातीला तिचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आणि कुटुंबाकडूनही फारसा पाठिंबा मिळाला नाही, ज्यामुळे काही काळ तिने चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता; पण नंतर चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर १९८८ मध्ये ‘तेजाब’ या चित्रपटातील मोहिनीच्या भूमिकेमुळे ती एका रात्रीत स्टार बनली.
माधुरीने आजवर ‘अबोध’, ‘परिंदा’, ‘त्रिदेव’, ‘मुजरीम’, ‘इलाका’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘प्यार का देवता’, ‘साजन’, ‘खेल’, ‘अंजान’, ‘हम आपके हैं कौन’, ‘राजकुमार’, ‘कोयला’, ‘दिल तो पागल हैं’, ‘वजूद’, ‘पुकार’, ‘देवदास’, ‘हम तुम्हारे हैं सनम’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या आहेत. परंतु, माधुरी अशा एका चित्रपटात काम करीत होती, ज्यासाठी तिने आधी होकार दिलेला; परंतु जेव्हा त्या चित्रपटातील एक सीन करण्याची वेळ आली तेव्हा तिने नकार दिला.
माधुरी दीक्षितला दिग्दर्शकाने चित्रपटातील एका सीनसाठी ब्लाऊज काढावा लागणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु, तिनं असं करण्यास नकार दिल्यानं त्यांनी तिला हा सीन कर किंवा चित्रपटातून बाहेर पड, असं म्हटलेलं. हा चित्रपट होता (Shanakht) ज्याचं दिग्दर्शन टिनू आनंद यांनी केलं होतं. त्यामध्ये अमिताभ बच्चन व माधुरी मुख्य भूमिकांत झळकलेले. जेव्हा टिनू आनंद यांनी तिला सीन समजावला तेव्हा तिनं त्यासाठी होकार दिलेला.
‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत टिनू आनंद यांनी याबद्दल सांगितलेलं. ते म्हणालेले, “मी तिला सुरुवातीलाच सांगितलेलं. त्यातील सीनसाठी ब्लाऊज काढावा लागेल. तिनं ब्रा घातलेली असेल आणि त्यावर सीन शूट होणार. तिच्यापासून काहीही लपवण्यात आलेलं नव्हतं. कथानकाची तशी गरज होती. मी तिला असंही सांगितलेलं की, शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तो सीन शूट होणार आहे”.
अमिताभ बच्चन यांनी काढलेली दिग्दर्शकाची समजूत
दिग्दर्शकाने पुढे सांगितलेलं, “शूटिंगच्या पहिल्या दिवशी जेव्हा तो सीन शूट करायचा होता तेव्हा तिनं नकार दिला. मी तिला विचारलं की, काय झालं तर तिनं सांगितलं की, टिनू मला हा सीन करायचा नाहीये. तेव्हा मी म्हणालेलो की, सॉरी! पण तुला तो करावाच लागेल. नाही तर तू या चित्रपटातून बाहेर पड. त्यावर अमिताभ बच्चन म्हणालेले, जाऊ दे ना, कशाला वाद वाढवताय. तिला नसेल करायचा सीन. तेव्हा मी म्हणालो की, तसं तिनं आधीच सांगायला हवं होतं.”
माधुरी दीक्षितच्या सेक्रेटरीनं टिनू आनंद यांना भेटून सांगितलं की, ती तो सीन करण्यासाठी तयार झाली आहे. त्यानंतर या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं; पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटला यश मिळालं नाही आणि हा चित्रपट फ्लॉप ठरला.