Astitva Complets 25 Years : महेश मांजरेकर यांनी आजवर अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. मराठीसह त्यांनी हिंदी चित्रपटांचंही दिग्दर्शन केलंय. अशातच आता त्यांच्या ‘अस्तित्व’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २५ वर्ष झाली आहेत. यानिमित्त त्यांनी चित्रपटाबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे.
महेश मांजरेकर यांच्या ‘अस्तित्व’ या चित्रपटाला २००० साली राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री तब्बू, सचिन खेडेकर, नम्रता शिरोडकर, स्मिता जयकर, सुनील बर्वे हे कालाकार झळकले होते. ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना महेश यांनी याबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, “‘अस्तित्वला’ २५ वर्ष पूर्ण झाली असली तरी ही कालचीच गोष्ट आहे असं वाटतं.”
महेश मांजरेकर पुढे म्हणाले, “एरवी जेव्हा एखाद्या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्यातील गोष्टी, घटना या आताच्या काळाशी जोडल्या जात नाीहत; त्या जुन्या वाटतात, पण हा चित्रपट अजूनही फ्रेश वाटतो. आजही जेव्हा मी हा चित्रपट बघतो तेव्हा मला आताच्या काळातील गोष्टींशी संबंधित वाटतो. त्यामुळे मला वाटतं की, ‘अस्तित्व’ हा फार महत्त्वाचा चित्रपट आहे.”
लेकीसाठी ‘अस्तित्व’ बनवला
महेश मांजरेकर पुढे म्हणाले, “मी माझ्या लेकीसाठी अस्तित्व बनवला. तिच्या जन्मानंतरच मला ही कल्पना सुचली. मी तिचं नाव अश्वमी ठेवलं जे फार वेगळं आहे. कधी कधी मी विचार करतो की तिला तिचं अश्वमी महेश मांजरेकर हे नाव जपता येईल का? या विचारानेच मी ‘अस्तित्व’ बनवला. ‘अस्तित्व’ हा मी बनवलेल्या चांगल्या चित्रपटांपैकी एक आहे.”
तब्बूची निवड कशी झाली?
तब्बूबद्दल महेश मांजरेकर म्हणाले, “तब्बू सुरुवातीला चित्रपटाचा भाग नव्हती, तेव्हा ती २८ वर्षांची होती. मी तिचा विचारही केला नव्हता. मी इतर अभिनेत्रींना यासाठी विचारलेलं. आता मला त्यांची नावं घ्यायची नाहीयेत. मी माधुरी दीक्षितलाही एकदा ही कथा ऐकवली होती, पण तिला फार आवडली नाही आणि त्यात काहीच गैर नाही. त्या सगळ्याच त्यावेळी लहान होत्या, त्यामुळे मी कोणालाही दोष देत नाही.”
महेश मांजरेकर याबद्दल म्हणाले, “हे सगळं खूप अचानक घडलं. मी तिला फिरोझ नाडियादवाला यांच्या घरी भेटलो. मी त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा तीसुद्धा तिथेच होती. मी तेव्हा अर्धी स्क्रीप्ट वाचून दाखवली, तिला ती आवडली, पण सुरुवातीला तिने नकार दिलेला. त्या रात्री मी तिला मेसेज केला की तुला कधीच हा चित्रपट केल्याचा पश्चाताप होणार नाही वगैरे. आता मला मी तेव्हा नेमकं काय बोललो होतो ते आठवत नाही. त्या गोष्टीला खूप वेळ झाला. त्यानंतर तिने लगेच होकार दिला. मला वाटतं, जर मी तिच्या जागी दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीची निवड केली असती तरी भारतातलीच काय जगातील कुठल्याही अभिनेत्रीने, तिने अदितीच्या भूमिकेला न्याय दिला तसा न्याय दिला नसता.”
‘अस्तित्व २’बद्दल महेश मांजरेकर यांची प्रतिक्रिया
मुलाखतीत महेश यांना या चित्रपटाच्या सिक्वलबद्दल विचारल्यानंतर ते म्हणाले, “ही खूप छान कल्पना आहे. अजून कोणीतरी मला याबद्दल सुचवलं होतं. मी अजून गांभीर्याने याबद्दल विचार केलेला नाहीये, पण हो, ही कल्पना छान आहे. जेव्हा मला ‘अस्तित्व’ची संकल्पना सुचली, तेव्हा एक दीड वर्ष माझ्या डोक्यात तोच विचार सुरू होता आणि मी त्याचा स्क्रिनप्लेही लिहून काढलेला. असंच जर पुन्हा मला काही कल्पना सुचली तर कदाचित मी ‘अस्तित्व २’ बनवेन.”