Mahesh Bhatt Praises Son In Law Ranbir Kapoor : आलिया भट्ट व रणबीर कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. दोघेही उत्कृष्ट कलाकार आहेत आणि त्यांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. अशातच आता आलिया भट्टचे वडील दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्यांच्या लेकीबद्दल व जावयाबद्दल सांगितलं आहे.

महेश भट्ट यांनी सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्टबद्दल आणि तिच्या करिअरबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, “‘शानदार’ हा चित्रपट फ्लॉप ठरला तेव्हा आलियाने पहिल्यांदा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतरची परिस्थिती कशी असते ते अनुभवलेलं; त्यापूर्वी तिचे काही चित्रपट चांगले चाललेले. ती बाहेरून जरी खूप खंबीर वाटत असली तरी अपयश अपयश असतं, ज्यामुळे तुम्हाला कळतं की तुम्हीसुद्धा सर्वसामान्य आहात आणि या इंडस्ट्रीत असं कोणीही नाहीये, ज्याने अपयश पाहिलेलं नाही. याला फक्त राज कपूर साहेब अपवाद ठरले.”

महेश भट्ट यांनी केलं जावई रणबीर कपूरचं कौतुक

रणबीर कपूरबद्दल विचारल्यानंतर ते म्हणाले, “रणबीरला गोष्टींबद्दल खूप स्पष्टता असते. मी इंडस्ट्रीत त्याच्याइतका कुटुंबाची काळजी करणारा माणूस पाहिलेला नाहीये. त्याला त्याचं घर आणि मुलगी खूप प्रिय आहे. तो खूप वाचन करतो, अनेकांना याबद्दल माहिती नाहीये, पण तो खूप वाचन करतो, खूप सिनेमे पाहतो. आम्ही कुठल्याही गोष्टीवर बोलत असतो तेव्हा तो मोजकच बोलतो, मितभाषी आहे तो, पण इतर लोक काय बोलत आहेत हे लक्ष्य देऊन एकतो आणि हा एक कलाकार म्हणून त्याच्यातील खूप चांगला गुण आहे.”

महेश भट्ट पुढे लेकीचं कौतुक करत म्हणाले, “आलियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला, तिला एक मूल आहे आणि ती कामसुद्धा करते. ती नुकतीच एका कार्यक्रमासाठी गेलेली, तिथे ती तिच्या मुलीला बरोबर घेऊन गेलेली. मी नुकतेच अमिताभ बच्चन आणि तिच्याबरोबर एका जाहिरातीसाठी शूटिंग केलं, तेव्हा आलिया राहाला घेऊन आलेली.”

महेश भट्ट पुढे म्हणाले, “राहासाठी सेटवर एक व्हॅनिटी होती, जी खूप सुंदर आणि छान होती. मला जवळपास ती एका मंदिरासारखी वाटली. आलिया मला म्हणाली, बाबा तुम्ही राहाजवळ तिच्या व्हॅनिटीमध्ये जाऊन का बसत नाही? मी म्हणालो, नको नको, माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला तिथे जागा नाही. पण, या हल्लीच्या नवीन काळातील अभिनेत्री आहेत, त्या मुलांचा सांभाळही करतात; मोठ्या ब्रँडसाठी कामही करतात आणि मुलांनाही बरोबर घेऊन जातात.”