Mahima Chaudhry Divorce : ‘परदेस’ फेम महिमा चौधरी ‘दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रमोशनसाठी ती व संजय मिश्रा वधू-वरासारखे तयार झाले होते. त्यामुळे त्यांनी खरंच लग्न केलंय की काय अशा चर्चाही रंगल्या होत्या. महिमाचे संजय मिश्रांबरोबरचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या मोडलेल्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर बोललं जातंय.

महिमा चौधरी ही ९० च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. महिमा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिली होती. महिमाने टेनिस स्टार लिएंडर पेसला डेट केलं होतं. नंतर तिने कोलकात्याचा आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीशी लग्न केलं, पण तिचा घटस्फोट झाला.

महिमाने १९ मार्च २००६ रोजी वयाच्या ३३ व्या वर्षी बॉबी मुखर्जीशी लग्न केलं. बॉबी मुखर्जी घटस्फोटित होता. लग्नानंतर महिमाला मुलगी झाली. काही काळाने महिमा व बॉबीच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या. दोघांमध्ये मतभेद झाले. याचदरम्यान दोन वेळा तिचा गर्भपात झाला. पण या कठीण प्रसंगात बॉबी तिच्याबरोबर नव्हता. याबद्दल आई-वडिलांना सांगितलं नव्हतं, कारण त्यांना काळजी वाटली असती. इव्हेंटला जायचं असेल तर मुलीला आई-वडिलांकडे ठेवायचे, असं महिमा म्हणाली होती.

महिमा व तिच्या पतीचे मतभेद

महिमा २०११ मध्ये पतीपासून वेगळी राहू लागली. २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ‘बॉलीवूड बबल’शी बोलताना महिमा म्हणालेली, “आम्ही वेगळे झालो तेव्हा मुलीला शाळेत टाकायचा विचार करत होतो. आमच्यात अडचणी होत्या, कोणत्या शाळेत टाकायचं यावर आमचं एकमत होत नव्हतं. तो युरोप ट्रिपला जात होता, तेव्हा त्याने पुन्हा मत बदललं. त्याने जिथे शिक्षण घेतलं तिथेच मुलीला शिकवायचं असं तो म्हणाला. पण मी नकार दिला,” असं महिमाने सांगितलं.

महिमा चौधरीचा अपघात

महिमाने सिंगल मदर म्हणून मुलीचे संगोपन केले, पण हे करणं खूप कठीण होतं. कारण तिची आई त्यावेळी आजारी होती आणि तिची बहीण देखील सिंगल मदर होती. तिला कामावर जावं लागायचं, त्यामुळे मुलीची काळची घ्यायला तिला मदनीसवर अवलंबून राहावं लागत होतं. ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान महिमाचा भयंकर अपघात झाला होता. तिच्या कारला एका ट्रकने धडक दिली आणि तिच्या चेहऱ्यावर काचेचे ६७ तुकडे शिरले होते. याचा तिच्यावर मानसिक आणि भावनिक परिणाम झाला.

बॉबी मुखर्जी कोण आहे?

बॉबी मुखर्जी आर्किटेक्ट आहेत. ते सोशल मीडियावर सक्रिय आहे. लिंक्डिन प्रोफाइलवरील माहितीनुसार त्यांचे मुंबई, दिल्ली व इटलीतील मिलान शहरात ऑफिस आहे.