अनुराग बासू दिग्दर्शित ‘आशिकी ३’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसह दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला पाहायला मिळणार आहे. सध्या ‘आशिकी ३’ चित्रपटाचं जोरदार चित्रीकरण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये ‘आशिकी ३’ चित्रपटात झळकणारी अभिनेत्री श्रीलीलाबरोबर गैरवर्तन केल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी श्रीलीलासह कार्तिक आर्यन दिसत आहे. पण, तो तिच्या पुढे चालत असल्यामुळे अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं? हे त्याला कळतं नाही. मात्र चाहत्याच्या गैरवर्तनामुळे श्रीलीला घाबरलेली पाहायला मिळत आहे.

व्हिडीओत, कार्तिक व श्रीलीला यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसत आहे. यावेळी सुरक्षा रक्षक गर्दीतून दोघांना सांभाळून नेत असतात . पण, याचवेळी गर्दीतून एक चाहता चालत असलेल्या श्रीलीलाचा अचानक हात पकडून तिला जोरात खेचतो. त्यामुळे श्रीलीला पूर्णपणे मागे खेचली जाते. हे पाहताच सुरक्षा रक्षक तिला गर्दीतून कसेबसे बाहेर काढतात. चाहत्याच्या या कृत्यामुळे श्रीलीला घाबरते. दुसऱ्याबाजूला कार्तिक आर्यन त्याच्याच जगात हरवून पुढे जाताना दिसत आहे. पण, काही वेळाने तो मागे वळून पाहतो, तितक्यात श्रीलीलाला सुरक्षा रक्षकांनी गर्दीतून बाहेर काढलेलं असतं. श्रीलीलाबरोबर घडलेल्या या गैरवर्तनावर चाहत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

श्रीलीलाच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं, “असं कोण करतं? हे लाजिरवाणं आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं, “असे प्रकार करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे.” तसंच काही जण कार्तिक आर्यनला अभिनेत्रीचं रक्षण न केल्यामुळे ट्रोल करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “कार्तिकने त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे लक्ष दिलं पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, १९९० साली ‘आशिकी’ चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. महेश भट्ट दिग्दर्शित व राहुल रॉय, अनु अग्रवाल, दीपक तिजोरी अभिनीत ‘आशिकी’ चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील गाणी अजूनही तितक्याच आवडीने ऐकली जातात. ‘आशिकी’ चित्रपटाचा दुसरा भाग २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर झळकले होते. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्यानंतर आता लवकरच कार्तिक आर्यन व श्रीलीलाचा ‘आशिकी ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘आशिकी ३’ हा पहिल्या दोन चित्रपटांसारखा सुपरहिट ठरतो की नाही, हे येत्या काळात पाहायला मिळेल.