Movies Release This Week: मे महिन्याचे हे शेवटचे काही दिवस चित्रपट प्रेमींसाठी खास असणार आहेत, कारण या आठवड्यात एक नाही तर ५ नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सूरज पंचोलीचा ‘केसरी वीर’ चित्रपट या आठवड्यात रिलीज होतोय. तो बऱ्याच वर्षांनी बॉलीवूडमध्ये कमबॅक करतोय. तसेच थिएटर प्रदर्शन रद्द झालेला ‘भूल चुक माफ’ अखेर या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या आठवड्यात इतर कोणते नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ते जाणून घेऊयात.
भूल चूक माफ
राजकुमार रावचा बहुप्रतिक्षित ‘भूल चूक माफ’ चित्रपट त्याच्या प्रदर्शनाबाबत वादात सापडला आहे. आधी हा चित्रपट ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु निर्मात्यांनी अचानक घोषणा केली की तो ओटीटीवर रिलीज केला जाईल, त्यानंतर पीव्हीआर आयनॉक्सने निर्मात्यांविरुद्ध खटला दाखल केला. आता अखेर हा चित्रपट २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये राजकुमार रावसोबत वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच संजय मिश्रा, सीमा पाहवा, झाकीर हुसैन, रघुबीर यादव, इश्तियाक खान आणि अनुभा फतेहपुरिया देखील या चित्रपटात आहेत.
केसरी वीर
सूरज पंचोली व सुनील शेट्टी यांचा ‘केसरी वीर: लेजेंड ऑफ सोमनाथ’ हा चित्रपट २३ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या कलाकारांव्यतिरिक्त, विवेक ओबेरॉय देखील चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. यामध्ये, आकांक्षा शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट १४ व्या शतकात सोमनाथ मंदिराचे रक्षण करणाऱ्या योद्ध्यांच्या कथेवर आधारित आहे.
कपकपी
‘गोलमाल ३’ नंतर श्रेयस तळपदे व तुषार कपूर ‘कपकपी’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, जो २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोन कलाकारांशिवाय या चित्रपटात दिव्येंदू भट्टाचार्य, इशिता राज शर्मा, साहिल वर्मा आणि मनमीत कौर यांच्याही भूमिका आहेत.
मंगलाष्टका रिटर्न्स
‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा योगेश भोसले दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. कमलेश सावंत, प्रसाद ओक आणि प्रसन्न केतकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
लिलो अँड स्टिच
इंग्रजी चित्रपटांची आवड असलेल्यांसाठी या आठवड्यात एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. अमेरिकन सायन्स फिक्शन कॉमेडी ड्रामा चित्रपट ‘लिलो अँड स्टिच’ देखील २३ मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होतोय. या चित्रपटात बिली मॅग्नेसेन, हन्ना वॅडिंगहॅम आणि टिया कॅरेरे यांच्या भूमिका आहेत. डीन फ्लेशर कॅम्प यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.