अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा चांगलाच सुपरहीट ठरला. चित्रपटाने आत्तापर्यंत १९० कोटीचा आकडा पार केला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाचा उदंड प्रतिसाद दिला आहे. केवळ मुख्य कलाकारच नव्हे तर सहाय्यक कलाकारांची कामंदेखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशी हिनेसुद्धा छोटी भूमिका निभावली होती.

नेहाने या चित्रपटात अंडरकव्हर कॉप जेनी थॉमस हे पात्र साकारलं आहे. विजय साळगांवकरची शेजारीण बनून जेनी विजयच्या विरोधात पुरावे गोळा करते आणि पुन्हा त्याची केस ओपन करायला मदत करते. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार नेहाबरोबर एक धक्काडायक प्रसंग ‘दृश्यम २’च्या सेटवर घडला होता त्याबाबतीतच नेहाने नुकताच खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “माझे ओठ आणि…” बॉलिवूड अभिनेत्री सैयामी खेरचा ‘बॉडी शेमिंग’बाबत मोठं विधान

चित्रपटाच्या सेटवर नेहाबरोबर एक अपघात झाला त्याविषयीच नेहाने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. नेहा म्हणाली, “प्रत्येक चित्रपट करताना काही आठवणी आपल्याबरोबर कायम राहतात. आम्ही जेव्हा ‘दृश्यम २’साठी मुंबईत चित्रीकरण करत होतो तेव्हा एके ठिकाणी मला पोहोचायचं होतं. मी माझ्या इच्छित स्थळी पोहोचले आणि मी माझ्या कारमधून उतरतच होते, तेव्हा ड्रायव्हरने चुकून गाडी पुढे नेली आणि ती माझ्या पायावरून गेली. “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे नेहा म्हणाली, “सेटवरील लोकांना याबद्दल समजताच सगळेच माझ्या मदतीला धावून आले. सगळ्यांनी माझी नीट काळजी घेतली. सेटवरील प्रत्येक व्यक्ती माझी विचारपूस करत होता. हे खरंच माझ्यासाठी नवीन होतं आणि मी खूप भावूकदेखील झाले.” याच मुलाखतीत नेहाने तिची आवडती अभिनेत्री तबूबरोबर काम करायला मिळाल्याच्या अनुभवाबद्दल सांगितलं. लवकरच ‘दृश्यम २’ २०० कोटी कमाईचा आकडा गाठेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे.