फिल्म इंडस्ट्रीत काम केल्यानंतर ब्रेक घेणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. काही अभिनेत्री ब्रेकनंतर माधुरी दीक्षितप्रमाणे कमबॅक करतात, तर काही मात्र संसारात रमतात किंवा वेगळं करिअर निवडतात. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री आहे, जिने सुपरहिट बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आणि आता ती मुंबई सोडून दुसऱ्या देशात स्थायिक झाली आहे.

‘अर्जुन पंडित’, ‘क्रांती’ चित्रपट आणि ‘कहता है दिल’, ‘वैदेही’ व ‘इतना करो ना मुझे प्यार’ या मालिकांमध्ये काम करून मराठमोळी अभिनेत्री पल्लवी कुलकर्णीला लोकप्रियता मिळाली. पल्लवी सध्या अभिनयापासून दूर आहे. पल्लवीने मुंबई सोडली असून ती कुटुंबाबरोबर दुबईत राहतेय. अभिनय सोडलेा नाहीये, चांगल्या ऑफर आल्यास काम करणार असं पल्लवीने सांगितलं.

मी फार आनंदी नव्हते, पण…

पल्लवी इ टाइम्सशी बोलताना म्हणाली, “मी मुंबई सोडून जगात इतर कुठेही स्थायिक होईन, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण नियतीच्या मनात कदाचित माझ्यासाठी वेगळे प्लॅन्स होते. माझ्या पतीला दुबईमध्ये कामाची चांगली संधी मिळाली. सुरुवातीला मी दुबईला जाण्यासाठी फार आनंदी नव्हते, पण काही आठवड्यांनी मी शिफ्ट होण्यास तयार झाले. दुबई खूप सुंदर आहे आणि मुंबईपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे जर मला कामाच्या ऑफर आल्या किंवा मला माझ्या आई-वडिलांना, सासू- सासऱ्यांना भेटायचं असेल तर मी खूप लांब राहत नाही. मला चांगल्या कामाच्या ऑफर येतील, अशी आशा मला आहे.”

“मला मुलगा झाला. माझे पती त्यांच्या करिअरमध्ये चांगलं काम करत आहेत, त्यामुळे मला माझं करिअर करण्यात काहीच रस नाही, असं खूप जणांना वाटलं होतं. पण माझ्या पतीचे करिअर पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आणि त्यांनी मला माझ्या कामात नेहमीच साथ दिली आहे,” असं पल्लवी म्हणाली.

चांगली ऑफर मिळाल्यास काम करायला आवडेल – पल्लवी

“मी नेहमीच चांगल्या कामासाठी प्रयत्न करत असते. २०२१ मध्ये, मी महेश मांजरेकर यांच्याबरोबर एक वेब शो केला. अनेक कलाकारांना मी ओटीटीवर काम करताना पाहत आहे. टीव्हीवर काही शो आहेत, जे खूप चांगलं काम करत आहेत. पण ओटीटीमध्येही अनेक संधी आहेत आणि मला चांगल्या ऑफर मिळाल्या तर मला काम करायला आवडेल. ‘इतना करो ना मुझे प्यार’ नंतर, मला चांगल्या ऑफर मिळाल्या नाहीत,” असं पल्लवीने नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पल्लवी कुलकर्णीने २००७ मध्ये मिहीर नेरूरकरशी लग्न केलं होतं. या जोडप्याला एक मुलगा आहे. सध्या पल्लवी पती व मुलाबरोबर दुबईत राहते.