Masti 4 Teaser : ‘मस्ती’ फ्रँचायझीची सुरुवात २००४ मध्ये झाली होती. यामध्ये रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘मस्ती’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता या तिघांची मॅड कॉमेडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मस्ती’ फ्रँचायझीच्या चौथ्या भागाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा कधी रिलीज होणार आणि यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार जाणून घेऊयात…
‘मस्ती ४’ सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये पुन्हा एकदा रितेश, विवेक आणि आफताब यांचं त्रिकुट पाहायला मिळणार आहे. यामध्ये श्रेया शर्मा, रुही सिंग आणि एलनाझ नोरोझी या अभिनेत्रींची वर्णी लागली आहे.
‘मस्ती ४’ येत्या २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिलाप झवेरी हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तर, ए. झुनझुनवाला, शिखा करण अहलुवालिया, इंद्र कुमार, अशोक ठाकेरिया, शोभा कपूर, एकता कपूर आणि उमेश बन्सल यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
दरम्यान, २००४ मध्ये पहिल्यांदा ‘मस्ती’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामध्ये अजय देवगण, विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदासानी, लारा दत्ता, अमृता राव, तारा शर्मा आणि जिनिलीया हे कलाकार होते. यानंतर ‘मस्ती’ चित्रपटाचे ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ असे दोन सीक्वेल अनुक्रमे २०१३ आणि २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता ‘मस्ती’चा चौथा भाग २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.