Met Gala 2025: जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट ‘मेट गाला २०२५’ न्यूयॉर्क येथे आयोजित केला आहे. न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे ‘मेट गाला’ मध्ये काल बॉलीवूड कलाकारांचा जलवा पाहायला मिळाला. शाहरुख खान, कियारा अडवाणी, दिलजीत दोसांझ, प्रियांका चोप्रा हे बॉलीवूडचे सेलिब्रिटी ‘मेट गाला’च्या कार्पेटवर दिसले. यातील शाहरुख, कियारा व दिलजीत यांचं यंदा ‘मेट गाला’च्या कार्पेटवर जबरदस्त पदार्पण झालं. शाहरुख खान हा ‘मेट गाला’मध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय अभिनेता ठरला. पण, भारतात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या या किंग खानला विदेशी मीडिया ओळखू शकलं नाही. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

‘मेट गाला २०२५’ मधील शाहरुख खानचा व्हायरल व्हिडीओ त्याच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शाहरुख खानची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळत आहे. याचवेळी विदेशी मीडिया विचारते की, तो कोण आहे? यावर नम्रपणे शाहरुख खान पुढे येऊन विदेशी मीडियाला स्वतःची ओळख करून देतो. अभिनेता म्हणतो, “मी शाहरुख आहे. माझा लूक सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केला आहे.”

‘मेट गाला २०२५’ मध्ये शाहरुख खानचं पदार्पण झाल्यानंतर त्याच्याशी खास संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्याला ‘मेट गाला’मध्ये पदार्पण करत त्याने इतिहास रचल्याबद्दल विचारलं. तेव्हा शाहरुख खान म्हणाला की, मला इतिहासाबद्दल माहीत नाही. पण, मी थोडा दडपणात आहे आणि उत्साही सुद्धा आहे. सब्यसाचीने येथे मला येण्यासाठी तयार केलं. मी जास्त रेड कार्पेटवर उपस्थित राहत नाही. कारण मी थोडा लाजाळू आहे. पण हे अद्भुत आहे.

यानंतर सब्यसाची मुखर्जी शाहरुखबद्दल म्हणाला की, फक्त कंटेंटसाठी शाहरुख खान जगभरातील सर्वात लोकप्रिय भारतीय व्यक्ती आहे. त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आज हॉटेल बाहेर येताना शाहरुखला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला रेड कार्पेटवर पाहता तेव्हा मला वाटते की प्रतिनिधित्व ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला शाहरुख खानला शाहरुख खान म्हणूनच सादर करायचे होते.

दरम्यान, ‘मेट गाला २०२५’ साठी शाहरुख खानने काळ्या रंगाचा लूक केला होता. काळ्या रंगाची ट्राउजर, वी-नेकलाइनचा वेस्टकोट आणि त्याबरोबर काळ्या रंगाचा ओव्हरकोट अशा आउटफिटमध्ये शाहरुख पाहायला मिळाला. या काळ्या रंगाच्या आउटफिटवर किंग खानने मल्टीलेअर्ड ज्वेलरी परिधान केली होती. तसंच त्यानं आपल्या नावाचं इनीशिल्स SRK आणि किंगचा K असं पँडेंटवाली ज्वेलरी परिधान केली होती. या ज्वेलरीमुळे शाहरुखचा लूक सुपरस्टाइलिश झाला होता.