Amitabh Bachchan Gave Advice To Singer: गायक मिका सिंग हा त्याच्या गाण्यासाठी जितका प्रसिद्ध आहे. तितकाच तो त्याच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतो. अनेकदा तो मुलाखतींमध्ये बॉलीवूडमधील कलाकारांचे किस्से सांगतो, त्यामुळे त्याची चर्चा होताना दिसते.

मला आमंत्रण दिले नव्हते…

आता मिका सिंगने एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांचा किस्सा सांगितला आहे. मिका सिंगने शुभांकर मिश्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत मिका सिंग म्हणाला, “एका दिवाळी पार्टीला मी अमिताभ बच्चन यांच्या घरी गेलो. मला त्यांनी आमंत्रण दिले नव्हते. तरीसुद्धा मी माझी हमर ही गाडी घेऊन गेलो.

माझी मोठी गाडी बघून गेटवरील पहारेकऱ्यांनी माझ्यासाठी गेट उघडले. त्यांना वाटले असणार की, मलाही आमंत्रण आहे. कारण- त्यांना वाटले की, मी कोणीतरी प्रसिद्ध व्यक्ती आहे. मी दोन-तीन वेळा गाडी तिथून फिरवली. तेव्हा अमिताभ बच्चन मला म्हणाले की, असे करण्यापेक्षा तू पार्टीत सहभागी हो. त्यानंतर मला ओशाळल्यासारखे वाटले.”

मिका सिंग पुढे म्हणाला, “मी घरात गेलो. तिथे सगळे नावाजलेल्या, प्रसिद्ध व्यक्ती हजर होत्या. सचिन तेंडुलकर, अंबानी हे अमिताभ बच्चन यांच्याभोवती उभे होते. इतर अनेक जण त्यांना भेटण्याची वाट बघत होते. त्या सगळ्यांना बघून मला अस्वस्थ वाटू लागले.

मी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करीत होतो. त्याच वेळी अमिताभ बच्चन यांनी सगळ्यांसमोर माझे नाव घेतले आणि मला थांबण्यास सांगितले. त्यांना तसे करण्याची काही गरज नव्हती पण त्यांनी ते केले. मी सगळ्यांची भेट घ्यावी म्हणून त्यांनी मला थांबायला लावले.

याआधीदेखील मिका सिंगने अनेकदा सलमान खान, शाहरुख खान व अमिताभ बच्चन हे त्याचे आवडते कलाकार असल्याचे म्हटले आहे. हे कलाकार ज्या माणुसकीने इतरांशी वागतात, ज्या प्रेमळपणे वागवतात, त्याचे अनेकदा मिका सिंगने कौतुक केले आहे.

मिका सिंगने शाहरुख खान व अमिताभ बच्चन यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना ५० लाख रुपयांची अंगठीदेखील भेट म्हणून दिली आहे. या दोन्ही कलाकारांनी ही अंगठी परत करण्याचा प्रयत्न केला; मात्र मिका सिंगने ती अंगठी परत घेतली नाही.

याच मुलाखतीत मिका सिंगने सलमान खानबाबत वक्तव्य केले होते. सलमान खानला भेटण्याची योग्य वेळ कोणती, याचा खुलासा त्याने केला होता. दिवसा तो रागात असतो. रात्री शांत वेळी त्याला भेटले पाहिजे. दोन पेग प्यायल्यानंतर सलमान खान सगळं मनातलं सांगतो. तसेच तो माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारतो. तसेच सलमान खान रात्रीच्या कोणत्याही वेळी त्याच्या मित्रांना फोन करतो आणि जर समोरच्याने फोन उचलला नाही, तर त्याला राग येतो, असा खुलासा मिका सिंगने केला आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन हे त्यांच्या व्यावसायिक, तसेच खासगी गोष्टींमुळे अनेकदा चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर ब्लॉगदेखील लिहितात. अनेकदा त्यांच्या ब्लॉगची चर्चा होताना दिसते. आता ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.