Vidhu Vinod Chopra Gifted Rolls Royce to Amitabh Bahchan: अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या एकलव्य: द रॉयल गार्ड सिनेमात काम केलं होतं. जेव्हा अमिताभ या सिनेमाच्या शूटिंगसाठी निघाले तेव्हा ते एक आठवडाही चोप्रांना सहन करू शकणार नाहीत, अशी खात्री जया बच्चन यांना होती. सिनेमाच्या शूटिंगसाठी जाताना बच्चन यांच्याकडे जास्त सामान नव्हतं, ते पाहून चोप्रा यांनी कारण विचारलं. त्यावर “जयाने मला सांगितलं होतं की मी तुम्हाला एका आठवड्यापेक्षा जास्त सहन करू शकणार नाही,” असं उत्तर बिग बींनी दिलं. जया बच्चनचा अंदाज खरा ठरला आणि बिग बी व विधू विनोद चोप्रा यांचा वाद झाला. खुद्द चोप्रा यांनीच सिद्धार्थ कन्ननशी बोलताना याची कबुली दिली.

४.५ कोटींची कार भेट दिली कारण…

“एक आठवडा, १० दिवसांत आमची भांडणं होऊ लागली. पण बच्चन थांबले, त्यांनी सिनेमा पूर्ण केला. त्यानंतर मी त्यांना ४.५ कोटी रुपयांची कार भेट दिली कारण त्यांनी मला सहन केलं. त्यांच्यासारख्या स्टारने मला सहन करणं हा त्यांचा नम्रपणा होता, मोठेपणा होता,” असं विधू विनोद चोप्रा म्हणाले.

पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत चोप्रा यांनी बिग बींना कार देताना त्यांच्या आईची प्रतिक्रिया काय होती, ते सांगितलं होतं. विधू विनोद चोप्रा यांनी बिग बींना महागडी भेटवस्तू दिली होती. स्वतःजवळ मारुती व्हॅन होती, तेव्हा आपण अमिताभ यांना चार कोटी रुपयांची रोल्स रॉयस फँटम भेट दिली होती, असं ते म्हणाले होते.

…अन् आईने कानाखाली मारली

“मी हा प्रसंग कधीच विसरणार नाही. अमिताभ यांना कार गिफ्ट करण्यासाठी मी माझ्या आईला घेऊन गेलो होतो. तिने त्यांना कारची चावी दिली. मग ती परत आली, माझ्या गाडीत बसली, जी निळ्या रंगाची मारुती व्हॅन होती. तिने बिग बींना ‘लंबू’ म्हटले. त्यावेळी माझ्याकडे ड्रायव्हर नव्हता म्हणून मी गाडी चालवत होतो. ती मला म्हणाली, ‘तू ‘लंबू’ला गाडी दिलीस?’ मी ‘होय’ म्हटलं. मग ती म्हणाली, ‘तू स्वतःसाठी कार का घेत नाहीस?’ मी तिला म्हणालो, मी कार घेईन पण त्याला अजून वेळ आहे. ती म्हणाली ‘तू भेट दिलेली गाडी ११ लाखांची असेल ना.’ मी तिला कारची किंमत सांगितल्यावर तिने मूर्ख म्हणत मला कानाखाली मारली होती,” असं विधू विनोद चोप्रा म्हणाले.

अमिताभ बच्चन, सैफ अली खान, संजय दत्त आणि विद्या बालन यांच्या भूमिका असलेला विधू विनोद चोप्राचा २००७ चा ‘एकलव्य: द रॉयल गार्ड’ (Eklavya: The Royal Guard) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नव्हता. मात्र या चित्रपटाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले होते. हा चित्रपट त्यावर्षीच्या ऑस्करला भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून पाठवला होता.