Nana Patekar : बहुप्रतीक्षित ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात तब्बल २० कलाकार एकत्र झळकणार आहेत. तरुण मनसुखानी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘हाऊसफुल ५’च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी रितेश देशमुख, अक्षय कुमार, चंकी पांडे, श्रेयस तळपदे असे सगळे कलाकार एकत्र उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सुद्धा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
ट्रेलरमध्ये नानांचा हटके अंदाज व देसी लूक पाहायला मिळत आहे. त्यांना ट्रेलर लॉन्च सोहळ्यात पापाराझींकडून इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्यात आला यावर त्यांनी “मला इंग्रजी येत नाही, हिंदीमध्ये प्रश्न विचारा” असं उत्तर दिलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत.
याशिवाय दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये नाना पाटेकर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबरोबर मराठीत संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी जॅकलिनला मराठीत “तू कशी आहेस” असा प्रश्न विचारला. तिला मराठी भाषा समजत नसल्याने अभिनेत्रीने यावर काय उत्तर दिलंय पाहुयात…
नाना पाटेकर सेटवरचा अनुभव सांगत म्हणाले, “सेटवर मी यांच्याबरोबर मराठीमध्ये बोलतोय यापेक्षा मोठा प्रँक दुसरा कोणताच असू शकत नाही. कारण, या लोकांना मराठी येत नाही. जॅकलिन तू कशी आहेस सांग पाहू…” जॅकलिनला ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित लोकांनी व सहकलाकारांनी “मी बरी आहे…” असं उत्तर देण्यास सांगितलं. जॅकलिनने तेच ऐकून “मी बरी आहे, छान आहे” असं नानांना सांगितलं.
नाना पाटेकर पुढे म्हणाले, “या सगळ्यांशी मी सेटवर मराठीतच बोलत होतो. काहीजण सोडल्यास यापैकी कुणालाच मराठी बोलता येत नाही… आणि खरं सांगायचं झालं, तर मराठीच काय यांना हिंदी सुद्धा नीट बोलता येत नाही. त्यामुळे आमच्या सेटवर एक वेगळी गंमत असायची. सगळेजण एकत्र असायचे. इतके स्टार्स एकत्र काम करताना कोणाच्या मनातही असुरक्षिततेची भावना नव्हती. कसं असतं दोन कलाकार एकत्र असतात तेव्हा इनसिक्योरिटी निर्माण होते. पण, आमच्या चित्रपटात एकूण १८ जण एकत्र काम करत होते. त्यामुळे सेटवर अजिबात इनसिक्योरिटी नव्हती.”
दरम्यान, ‘हाऊसफुल ५’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंग, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लीव्हर, श्रेयस तळपदे, डिनो शर्मा, डीनो शर्मा, डीनो शर्मा, रणजी शर्मा, नाना पाटेकर, आणि आकाशदीप साबीर असे एकूण २० दमदार कलाकार एकत्र झळकणार आहेत. हा सिनेमा संपूर्ण जगभरात येत्या ६ जूनला प्रदर्शित होणार आहे.