Nawazuddin Siddiqui on his father: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजपर्यंत हड्डी, सायको रामण, रात अकेली हैं, गँग्स ऑफ वासेपुर, सरफरोश अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. हे चित्रपट मोठ्या प्रमाणत गाजले आहेत. वेब सीरिजमध्येदेखील विविध भूमिका साकारत त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेता अनेकदा त्याच्या वक्तव्यामुळेदेखील चर्चेत असतो. आता नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या लहानपणीचे काही किस्से सांगितले आहेत. तसेच, त्याने त्याच्या वडिलांबद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

नवाजुद्दीनने नुकतीच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला की, जेव्हा मी मोठ्या शहरांमध्ये राहायला लागलो, त्यावेळी मला याची जाणीव झाली की माझ्या आणि माझ्या वडिलांच्या नात्यात काहीतरी असे आहे, जे चांगले नाही.

“मी अनेक वेळा त्यांना….”

नवाजुद्दीन म्हणाला, “जेव्हा मी शहरामध्ये आलो, त्यावेळी मी पाहिले की वडीलसुद्धा त्यांच्या मुलांवर प्रेम करू शकतात. कारण- मी जिथे वाढलो तिथे असे माझ्या वडिलांबरोबर माझे नाते नव्हते. आम्ही खूप बोलत असू, पण मी अनेक वेळा त्यांना गृहीत धरत असे, याची जाणीव मला खूप उशिरा झाली. त्यांच्या निधनानंतर मला या गोष्टींची जाणीव झाली.”

याच मुलाखतीत अभिनेत्याने वडिलांच्या खोटे बोलण्याच्या सवयीबद्दलदेखील वक्तव्य केले. अभिनेता म्हणाला, “मी जेव्हा जेव्हा त्यांना मी शूटिंगसाठी अमुक या देशात गेलो होतो असे सांगायचो, तेव्हा ते म्हणायचे की मी सुद्धा तिथे जाऊन आलो आहे. जेव्हा मी त्यांना त्या ठिकाणाचे वर्णन करण्यास सांगायचो तेव्हा ते म्हणायचे की ते खूप नीटनेटके आणि स्वच्छ आहे. मग मी त्यांना त्यांच्या पासपोर्टबद्दल विचारायचो आणि ते नेहमी म्हणायचे की ते कुठेतरी पडलेले असेल.”

अभिनेता पुढे म्हणाला, “मी जे काही करत आहे, ते त्यांनी आधीच केलेले आहे असे त्यांना सिद्ध करायचे असे. मला आठवते की जेव्हा अमिताभ बच्चन साहेब संसदेत होते तेव्हा माझे वडील दिल्लीला आले होते. त्यावेळी ते परत आल्यानंतर मला सांगायचे की मी अमिताभ बच्चन यांना भेटलो. पुढे ते असेही सांगत की बच्चन साहेबांनी माझी काळजी घेतली”, असे म्हणत वडील अनेकदा खोटे बोलत असत, असे अभिनेत्याने सांगितले.

पुढे अभिनेता असेही म्हणाला की, वडिलांच्या खोटे बोलण्याच्या सवयीमुळे इतका आत्मविश्वास मिळत असे की आम्ही स्वत:ला इतर कोणाहीपेक्षा कमी समजत नसे.

“मला त्यांच्यासारखे जगायचे नाही”

नवाजुद्दीनने असेही सांगितले की, माझे वडील आम्हाला अशा खोट्या गोष्टी सांगत असत. पण, बाहेरच्या जगाशी ते खूप प्रमाणिक होते. याच कारणामुळे त्यांनी अनेक बिझनेस डील गमावल्या, त्यामुळे त्यांना पडता काळ पाहावा लागला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप अपयश पाहिले, त्यांच्याकडे पाहिले की वाटायचे की आपण आपल्या आयुष्यात या गोष्टी करायच्या नाहीत. मला त्यांच्यासारखे जगायचे नाही. मला माहीत होते की मला कष्ट घ्यावे लागणार आहेत, कारण मला माझ्या वडिलांसारखे आयुष्य जगायचे नव्हते.”

जरी नवाजुद्दीनला त्याच्या वडिलांसारखे जगायचे नव्हते, तरी त्याच्यामध्ये अनुवंशिकतेने त्याच्या वडिलांमधील काही गुण आले आहेत. राग आणि असुरक्षितता हे गुण मला माझ्या वडिलांकडून मिळाले आहेत.

एका किस्सा सांगत नवाजुद्दीन म्हणाला, “एके दिवशी कोणीतरी मला विचारले की मी जगण्यासाठी काय करतो. त्याला मी सांगितले की, मी एक अभिनेता आहे; त्यावर तो मला म्हणाला की अभिनेत्यासारखा दिसत नाहीस. त्यानंतर मला जाणवले कीमी देखणा दिसत नसतानाही या टप्प्यावर पोहोचलो आहे; जर मी देखणा असतो तर मी किती पुढे जाऊ शकलो असतो किंवा कदाचित मी इथे पोहोचलो नसतो.”

दरम्यान, अभिनेता काही दिवसांपूर्वी थामा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.