Nawazuddin Siddiqui Talk’s About His Daughter : बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यानं आजवर अनेक चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आला होता. हा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीननं नुकतीच त्याच्या लेकीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

‘दी न्यू इंडियन’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्यानं याबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला, “माझं माझ्या मुलीबरोबर खूप घट्ट नातं आहे. काही वेळा मी तिच्यावर ओरडतो; पण तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ती दुबईत शिक्षण घेत आहे आणि ती खूप स्पष्टवक्ती आहे. माझ्यावर टीका करीत असते. तिला तिचे वडील अभिनेते आहेत याबद्दल फार काही वाटत नाही.”

अभिनेता पुढे म्हणाला, “ती माझ्यावर टीका करते आणि त्यामुळे मी जमिनीवर असतो. ती खूप चांगली गोष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे तिनं माझे बरेचसे चित्रपट पाहिलेले नाहीयेत. नवाजुद्दीननं तो घरी कमी असतो याबाबत सांगितलं आहे. तो म्हणाला, “व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामधला समतोल राखणं हे प्रत्येकाला जमत नाही आणि माझ्याबाबतही तसंच घडतं. माझ्यासाठी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि काम यामध्ये समतोल ठेवणं मला कठीण जातं.”

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं २००९ साली आलिया सिद्दीकीशी लग्न केलं होतं. त्याला एक मुलगी व एक मुलगा आहे. माध्यमांच्या वृत्तांनुसार काही दिवसांपूर्वी त्याच्या खासगी आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याचा त्याच्या पत्नीबरोबर काही गोष्टींवरून वाद असल्याचं म्हटलं गेलं होतं.

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं १९९९ मध्ये आलेल्या ‘सरफरोश’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर त्यानं ‘आजा नच ले’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘हड्डी’, ‘अद्भुत’, ‘ठाकरे’, ‘हाऊसफुल ४’, ‘रईस’, ‘जग्गा जासूस’, ‘बजरंगी भाईजान’, ‘मॉम’, ‘मुन्ना माइकल’, ‘किक’, ‘बदलापूर’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘तलाश’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केलं आहे.