प्रभास आणि क्रिती सेनॉनचा बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ चित्रपट आज (१६ जून) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगही हाऊसफुल्ल झाले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता हळूहळू याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या चित्रपटाबाबत सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, चित्रपटाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या एका व्यक्तीला प्रभासच्या चाहत्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मारहाण झालेल्या व्यक्तीने ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, निर्मात्यांनी चित्रपटात प्ले स्टेशन गेममधील सर्व राक्षस टाकले आहेत असं वाटतं. चित्रपटात हनुमान,आणि काही 3D शॉट्सशिवाय काहीही नाही. एवढंच नाही तर प्रभास ‘श्रीरामांच्या गेटअपमध्ये अजिबात शोभत नाही. बाहुबलीमधील त्याचा लूक खूप छान होता. त्यात तो राजासारखा दिसत होता, पण ओम राऊत यांनी प्रभासला योग्य पद्धतीने चित्रपटात दाखवलं नाही, असंही म्हणताना तो दिसत आहे.
चित्रपटाबाबत दिलेली ही नकारात्मक प्रतिक्रिया प्रभासच्या चाहत्यांना आवडली नाही. त्यांनी कॅमेरासमोरच त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर प्रभासचे चाहते आणि त्या व्यक्तीमध्ये वादावादी झाल्याचेही पाहायला मिळाले.
या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलं, “एवढं खरं नव्हतं बोलायचं.” दुसऱ्या युजरने रामाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे चाहते, रावणाच्या भक्तांसारखे वागतात.” म्हणत टीका केली आहे. तर एका युजरने मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. प्रभासने या चित्रपटात श्रीराम तर क्रिती सेनॉनने सीता मातेची भूमिका साकारली आहे. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमान तर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत श्रृपनखेच्या भूमिकेत आहे.