बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटानं आजवर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बॉलीवूड विश्वापासून ती सध्या दूर असली, तरी आयपीएल सामन्यांच्या निमित्तानं प्रीतीच्या नावाची चर्चा होताना दिसते. अशातच आता प्रीतीने केलेल्या एका कौतुकास्पद कामगिरीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
भारतीय सैनिकांच्या विधवा पत्नी व मुलांच्या भविष्यातील कल्याणासाठी प्रीतीनं आर्थिक मदत म्हणून ₹१.१० कोटी देणगी दिली आहे. प्रीतीनं ही देणगी दक्षिण-पश्चिम कमांडच्या ‘आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन’ला (AWWA) दिली आहे. ही देणगी आयपीएल संघ पंजाब किंग्जच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत देण्यात आली आहे. शनिवारी (२४ मे) जयपूरमध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमात प्रिती झिंटाने ही देणगी दिली. .
या कार्यक्रमात प्रीती झिंटा असं म्हणाली, “आपल्या सैनिकांच्या धाडसी कुटुंबांना पाठिंबा देणे हा आपला सन्मान आणि आपली जबाबदारीही आहे. आपल्या सशस्त्र दलांनी दिलेल्या बलिदानाची आपण कधीही परतफेड करू शकत नसलो तरी, आपण त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहू शकतो. त्यांना पुढे जाण्यास मदत करू शकतो. आम्ही भारतीय सैन्याच्या शौर्यावर अत्यंत अभिमान बाळगतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
प्रीती झिंटा एका सैनिकी घरातील मुलगी आहे. तिचे वडील दुर्गानंद झिंटा हे भारतीय सैन्यात मेजर होते. सैनिकांच्या घरातील कुटुंबियांचा संघर्ष आणि त्याग तिने खूप जवळून पाहिला आहे. त्यामुळे तिला देशाच्या सैन्याप्रती विशेष प्रेम आहे. याच प्रेमापोटी अभिनेत्रीने सैनिकांच्या कुटुंबियांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ही आर्थिक मदत जाहीर केली आहे. प्रीती झिंटाने केलेली मदत केवळ कौतुकास्पदच नाही, तर प्रेरणादायीही आहे.
दरम्यान, प्रीती झिंटाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच ती अभिनेते सनी देओल यांच्याबरोबर ‘लाहोर १९४७’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. बराच काळ मनोरंजनसृष्टीपासून लांब राहिल्यानंतर ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे तिचे अनेक चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.