Vashu Bhagnani net worth: बॉलीवूडचा खिलाडी म्हणून अभिनेता अक्षय कुमारची ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेत्याचे अनेक चित्रपट सलग फ्लॉप ठरले आहेत, त्यामुळे अनेकदा नेटकरी अक्षय कुमारला ट्रोल करताना दिसतात.

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. मात्र, या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार होते. त्याआधी प्रदर्शित झालेले केसरी चाप्टर २ आणि स्काय फोर्स या चित्रपटांनीदेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र, यातील एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही.

त्याआधी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘मिशन राणीगंज’, ‘बेल बॉटम’ हे मोठे बजेट असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटांची निर्मिती पूजा एंटरटेनमेंटने केली होती. वाशू भगनानी आणि त्यांचा मुलगा जॅकी भगनानी पूजा एंटरटेनमेंटचे मालक आहेत. बडे मियाँ छोटे मियाँ फ्लॉप ठरल्यानंतर अनेकांनी त्यांचे पैसे दिले नाहीत, अशी या बाप-लेकाच्या जोडीवर टीका केली होती.

३०० कोटी बजेट असणाऱ्या चित्रपटाने जगभरात फक्त १०० कोटींची कमाई केली होती. असेच काहीसे टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका असलेल्या गणपत चित्रपटाबाबत झाले होते. या सिनेमाने फक्त २० कोटींची कमाई केली होती. महत्त्वाची गोष्ट अशी की, गेल्या दोन दशकांत पूजा एंटरटेनमेंट बॅनरचा एकही चित्रपट हिट ठरला नाही.

वाशू भगनानी काय म्हणाले?

मात्र, तुम्हाला माहीत आहे का भगनानी कुटुंब हे फक्त चित्रपट उद्योगातील कमाईवर अवलंबून नाहीत, त्याचा रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शनचादेखील बिझनेस आहे. वाशू भगनानी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे. रौनक कोटेचा यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मी २०१८ मध्ये लंडनला गेलो होतो आणि मला काय करायचे याचा प्रश्न पडला, म्हणून मी मेफेअरमध्ये एक इमारत खरेदी केली. त्यानंतर मी तिथे पाच-सहा चित्रपट बनवले. मी निर्माता आहे, मी स्वत:चे पैसे एखाद्या प्रोजेक्टमध्ये गुंतवून पैसे मिळवण्यावर विश्वास ठेवत नाही. ज्याप्रमाणे मी चित्रपट बनवतो, त्याचप्रमाणे मी इमारती बांधतो.

“मी बॉलीवूडमधील एकमेव व्यक्ती आहे, ज्याचा लंडनमध्ये स्टुडिओ आहे. ६० फूट उंचीचे आमचे दोन मजले आहेत. लंडनमध्ये आमचा दोन एकरमध्ये आमचा स्टुडिओ आहे. व्हीएफएक्स सेटअप आणि व्हॅनिटी व्हॅनदेखील आहे.”

पुढे ते म्हणाले, “मला नीट इंग्रजी बोलता येत नाही. मी जेव्हा लंडनला जात होतो, त्यावेळी माझी मुलगी मला म्हणालेली, तुम्हाला व्यवस्थित इंग्रजी बोलता येत नाही, तुम्ही तिथे जाऊन काय करणार? तेथील लोक काय बोलतील ते तुम्हाला समजणार नाही. मी म्हणालो की, मला प्रयत्न तरी करू दे. लंडनमध्ये गेल्यानंतर मी तिथे एक स्टुडिओ निर्माण केला. मी दोन इमारती बनवल्या आणि पाच वर्षांत सहा चित्रपट बनवले. मी एक बिल्डिंग आणि एक चित्रपट बनवायचो. मी आतापर्यंत मुंबईत ४५ बिल्डिंग बांधल्या आहेत आणि त्या सर्व विकल्या गेल्या आहेत. पण, मी माझ्या चित्रपटांचा आयपी(IP) कधीच विकला नाही, अजूनही माझे चित्रपट माझ्या मालकीचे आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच मुलाखतीत वाशू भगनानींनी बडे मियाँ छोटे मियाँ फ्लॉप ठरल्यानंतर त्यांच्यावर पैसे न दिल्याच्या आरोपांबद्दलही वक्तव्य केले. ते म्हणाले, “लोकांनी केलेले आरोप ऐकून मी अस्वस्थ झालो होतो. जर मी खरोखरच दिवाळखोर झालो असतो तर मी माझी बिल्डिंग विकली असती. ती विकून लोकांचे पैसे दिले असते. मी कॉर्पोरेट कर्मचारी नाही, मी व्यवसाय करतो. जर मला नुकसान झाले तर मला ते भरून काढावे लागेल. पण, लोकांनी माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी पळून गेलो आहे, माझ्याकडे खाण्यासाठी पैसे नाहीत अशा अफवा पसरवल्या.”