Raid 2 box office collection Day 10: रितेश देशमुख व अजय देवगण यांची प्रमुख भूमिका असलेला ‘रेड २’ हा चित्रपट १ मे २०२५ ला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
‘रेड २’ या चित्रपटात रितेश देशमुख एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला प्रेम मिळत असल्याचे बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या आकड्यांवरून समोर येत आहे. आता १० दिवसांत या चित्रपटाने किती कमाई केली, हे जाणून घेऊयात.
प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटाने १९.२५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १२ कोटी, तिसऱ्या दिवशी १८ कोटी, चौथ्या दिवशी ‘रेड २’ने २२ कोटींची कमाई केली होती, तर पाचव्या दिवशी ७.५ कोटी, सहाव्या दिवशी ७ कोटी, सातव्या दिवशी ४.७५ कोटी, आठव्या दिवशी ५.२५ कोटींचा गल्ला जमवला होता. अशा प्रकारे अजय देवगणच्या ‘रेड २’ने पहिल्या आठवड्यात एकूण ९५.७५ कोटींची कमाई केली.
१० दिवसांत केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
तर नवव्या दिवशी या चित्रपटाने पाच कोटी कमावले व १० व्या दिवशी या चित्रपटाने ८.२५ कोटी इतकी कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यापासून ‘रेड २’ या सिनेमाने १० दिवसांत एकूण १०८.७५ कोटींची कमाई केली आहे. तर संपूर्ण जगभरात या चित्रपटाने १३७.८ कोटींची कमाई केली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या ‘जाट’ आणि अक्षय कुमारच्या ‘केसरी २’ पेक्षा ‘रेड २’ने जास्त कमाई केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अजय देवगणच्या ‘शैतान’ या चित्रपटाने १० व्या दिवशी ‘रेड २’ पेक्षा १.७५ कोटींनी जास्त कमाई केली होती. पण, अजय देवगणच्या ‘आझाद’ या चित्रपटापेक्षा ‘रेड २’ बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बॉलीवूड चित्रपटांना प्रेक्षकांचा सध्या फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक चित्रपट फ्लॉप ठरत आहेत. नुकताच इमरान हाश्मीचा ‘ग्राऊंड झिरो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, चित्रपटाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. याबरोबरच अक्षय कुमारचे एका पाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप ठरले, ज्यामध्ये ‘सरफिरा’, ‘खेल खेल में’, ‘सिंघम अगेन’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, ‘स्काय फोर्स’ व ‘केसरी २’ला प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
रितेश देशमुख हिंदीसह मराठी चित्रपटांतदेखील भूमिका साकारताना दिसतो. अभिनयाबरोबरच तो चित्रपट निर्मितीदेखील करतो. याबरोबरच रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ५’चे सूत्रसंचालन केले आहे. आता ‘रेड २’मधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.
दरम्यान, राज कुमार दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.