Rajesh Khanna’s rivalry with Amitabh Bachchan: बॉलीवूड अभिनेता रजत बेदी सध्या मोठ्या चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे सध्या तो आर्यन खानच्या द बॅड्स ऑफ बॉलीवूड या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अनेक वर्षांनंतर पुनरागमन केल्यानंतर रजत बेदीने आनंद व्यक्त केला. त्याच्या या भूमिकेबरोबरच त्याच्या काही वक्तव्यामुळेदेखील अभिनेता मोठ्या चर्चेत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याचे वडील नरेंद्र बेदी यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. नरेंद्र बेदी दिग्दर्शक आणि निर्माते होते.

“माझ्या वडिलांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर…”

रजत बेदीने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, अमिताभ बच्चन व राजेश खन्ना यांच्यातील शत्रुत्वामुळे वडील नरेंद्र बेदींना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यानंतर ते दारुच्या आहारी गेले. वडिलांच्या निधनाबद्दल रजत बेदी म्हणाला, “माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. मी शाळेतून आलो होतो, ते त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि जमिनीवर कोसळले. ते दारूच्या अधीन गेले होते. ते नैराश्याचा सामना करत होते. ते चांगलं काम करत होते, त्यांचं सगळं सुरळीत चालू होतं. पण, माझ्या आजोबांच्या डोक्यावर चित्रपटांमुळे काही कर्ज होतं, माझे वडील ते कर्ज फेडत होते.”

राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्यात असणाऱ्या स्पर्धेचा, त्यांच्यातील शत्रुत्वाचा त्यांच्या वडिलांना कसा तोटा झाला, याबद्दल रजत बेदी म्हणाला, “माझ्या वडिलांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर २-३ चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली होती. पण, जेव्हा माझ्या वडिलांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा राजेश खन्ना यांना वाईट वाटले.”

“मला खरी गोष्ट माहीत नाही, पण मला इतके माहीत आहे की, एक किंवा दोन चित्रपटांसाठी माझे वडील संपूर्ण युनिट पुण्याला घेऊन गेले. ते राजेश खन्ना यांच्या येण्याची वाट पाहत होते. १०-१५ दिवस राजेश खन्ना शूटिंगच्या ठिकाणी आले नाहीत. माझ्या वडिलांनी ते प्रोजेक्ट बंद केले. त्याचे त्यांना आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर ते दारुच्या आहारी गेले. अमिताभ बच्चन किंवा इतर काही कारणांमुळे राजेश खन्ना व माझ्या वडिलांमध्ये समस्या निर्माण झाल्या.

रजत बेदीने असाही खुलासा केला की, नरेंद्र बेदी व राजेश खन्ना रात्रभर दारूचे सेवन करत असत. रजत बेदी म्हणाला, “माझे वडील व राजेश खन्ना रात्रभर दारू प्यायचे. त्यांची जीवनशैली विचित्र होती. राजेश खन्ना सकाळी ५-६ वाजता त्यांच्या घरी जात असत. रात्रभर ते दारू प्यायचे.”

दारूच्या व्यसनाचा नरेंद्र बेदींच्या करिअरवर कसा परिणाम झाला, यावर रजत बेदी म्हणाला, “जेव्हा ते दारू पिऊन शूटिंगला जायचे तेव्हा परिस्थिती कठीण व्हायची. जेव्हा ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, त्यावेळी ते सकाळी दारू प्यायला सुरुवात करायचे. त्या दारूच्या वासासह ते सेटवर जायचे, त्यामुळे कमल हासनजी नाराज व्हायचे.”

नरेंद्र बेदी १९७२ साली प्रदर्शित झालेल्या ‘जवानी दिवानी’, तसेच राजेश खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बंधन’, ‘महाचोर’ या चित्रपटांसाठी ओळखले जातात. तसेच, त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘बेनाम’, ‘अदालत’ या चित्रपटांतदेखील काम केले आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन व राजेश खन्ना यांच्यात असलेल्या स्पर्धेबद्दल अनेक सहकलाकार, इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार आजही बोलताना दिसतात व त्यांच्या आठवणी सांगतात.