९०च्या दशकातील हिट ठरलेल्या बॉलिवूड चित्रपटांपैकी ‘करण अर्जुन’ एक आहे. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. “मेरे करण अर्जुन आऐंगे” हा चित्रपटातील डायलॉग तर आजही प्रेक्षकांच्या ओठावर असतो. या चित्रपटात शाहरुख खान व सलमान खानने करण-अर्जुनची भूमिका साकारली होती.
‘करण अर्जुन’ चित्रपटातील शाहरुख-सलमानची ऑन स्क्रीन जोडी भलतीच हिट ठरली होती. परंतु, या चित्रपटासाठी सलमान खानला पहिली पसंती देण्यात आली नव्हती. त्याच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली होती. ‘करण अर्जुन’ चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी याबाबत खुलासा केला आहे. राकेश रोशन यांनी नुकतीच सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडॉल’ शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये त्यांनी याबाबत खुलासा केला.
हेही वाचा>> “मी रोज सकाळी ८:३० वाजता जेवतो” संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत, म्हणाला “माझे बाबा…”
सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल सोशल मीडियावरुन या शोमधील एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत हर्ष लिंबाचिया राकेश रोशन यांना “तुम्ही एखाद्या कलाकाराला चित्रपटाची ऑफर दिली. पण काही कारणांमुळे त्या कलाकाराला चित्रपटात काम करणं जमलं नाही, असं कधी झालंय का?” हा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत ते म्हणाले, “कहो ना प्यार है चित्रपटासाठी करीना कपूरचं कास्टिंग झालं होतं. परंतु, काही कारणांमुळे तिला हा चित्रपट करता आला नाही”.
‘करण अर्जुन’ चित्रपटाबाबत ते म्हणाले, “करण अर्जुन चित्रपटात सलमान खानच्या भूमिकेसाठी अजय देवगणची निवड करण्यात आली होती. तेव्हा चित्रपटाचं नावही कायनात असं होतं. त्यात शाहरुख व अजय ही जोडी दिसणार होती. परंतु, काही कारणांमुळे अजय देवगणला हा चित्रपट करता आला नाही”.
‘करण अर्जुन’ चित्रपटात सलमान खानने करण तर शाहरुखने अर्जुनची भूमिका साकारली होती. या दोघांनाही चित्रपटात दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. अभिनेत्री राखी गुलजार या करण अर्जुनच्या आईच्या भूमिकेत होत्या. या चित्रपटात काजोल व ममता कुलकर्णी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या .