ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट थिएटर्समध्ये पाहिल्यानंतर सोशल मीडियावर यामधील डायलॉग व व्हीएफएक्सची चांगलीच चर्चा होत आहे. काहींना रावणाचे रूप आवडले नाही तर काहींना हनुमानजींची भाषा टपोरीसारखी वाटली. अनेकजणांनी चित्रपटात रामायणातील दृश्ये चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा- “आम्ही रामायण बनवलंच नाहीये…” ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांचा मोठा दावा
आता रामानंद सागर यांच्या रामायणात रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनीही ‘आदिपुरुषा’बाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अरुण गोविल म्हणाले, “रामायण हा भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. आता ज्याप्रकारे चित्रपटाबद्दल बोलले जात आहे हे ऐकून खूप वाईट वाटत आहे. रामायणाचा मूळ आत्मा आणि स्वरूप बदलण्याची गरज नव्हती.”
अरुण गोविल पुढे म्हणाले, रामायण हा आपल्यासाठी विश्वासाचा विषय आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड स्वीकारता येणार नाही. रामायणाबद्दल आधुनिकता किंवा पौराणिक कथांबद्दल बोलणे चुकीचे आहे. चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स आणि सादरीकरणाची बाब वेगळी आहे, परंतु त्यातील पात्रे योग्य पद्धतीने मांडणे आवश्यक आहे, या गोष्टी चिंतेचा विषय आहेत.”
हेही वाचा- दुसऱ्याच दिवशी ‘आदिपुरुष’ला बसणार जबरदस्त फटका; बॉक्स ऑफिसवर कमावणार फक्त ‘इतके’ कोटी
तसेच “आधुनिकता आणि पौराणिक कथांच्या चौकटीत राम-सीता-हनुमानाची विभागणी करणे चुकीचे आहे. आदिपुरुषमध्ये रामायणाची कथा सादर करण्यापूर्वी निर्मात्यांना ते लोकांच्या श्रद्धेच्या विषयाशी संबंधित रामायण कसे सादर करणार आहेत याचा विचार केला पाहिजे.” असेही अरुण गोविल म्हणाले.
या चित्रपटातील संवादांनाही प्रेक्षकांचा जोरदार विरोध होत आहे. याबाबत बोलताना अरुण म्हणाले की, अशी भाषा चांगली वाटत नाही आणि मी नेहमीच संयमी भाषा वापरतो. अशा परिस्थितीत मी रामायणातील अशा भाषेचे समर्थन करत नाही. रामायणाच्या मूळ भावापासून दूर जाण्याची काय गरज होती? असा प्रश्नही अरुण गोविल यांनी विचारला आहे.
