अभिनेता रणबीर कपूरला ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने रणबीर कपूरला ६ ऑक्टोबर रोजी रायपूर, छत्तीसगड येथील एजन्सीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. रणबीरशिवाय इतर १४-१५ सेलिब्रिटी आणि अभिनेते या प्रकरणात ईडीच्या रडारवर असून त्यांनाही लवकरच समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे.
रणबीर कपूरला ईडीकडून समन्स, अभिनेत्याची होणार चौकशी, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
“रणबीर कपूरला बेटिंग व्यवसायातील व्यवहार समजून घेण्यासाठी बोलावण्यात आले आहे. त्याला आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आलेले नाही. तर त्याला मिळालेल्या पैशाच्या स्रोतांबद्दल त्याच्याकडे असलेली माहिती जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी करणे महत्त्वाचे आहे. यामुळे प्रोमोटर्स आणि असोसिएशनबद्दलची माहिती मिळेल. रणबीर कपूर या घोटाळ्याचा भाग नसेल, परंतु घोटाळा समजून घेणे खूप महत्वाचे आहे,” असं वृत्त एका सूत्राच्या हवाल्याने न्यूज १८ ने दिलं आहे.
अभिनेता रणबीर कपूरला ईडीकडून समन्स; महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अॅप प्रकरण
मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अॅप प्रकरणात ही चौकशी केली जाणार आहे. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल प्रवर्तक असलेली कंपनी दुबईतून चालवली जात होती. २८ वर्षीय सौरभ चंद्राकरने अबुधाबीमध्ये लग्न केलं. त्याच्या लग्नात तब्बल २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या लग्नातील फोटो व व्हिडीओंची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. त्यानंतर याबाबत चौकशी करण्यात आली. चंद्राकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कमीत कमी ७० बनावटी कंपन्यांचा वापर या घोटाळ्यासाठी केल्याचीही माहिती उघड झाली. या प्रकरणात कोलकाता, भोपाळ आणि मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले होते.
श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, सोनाक्षी सिन्हा आणि इतरांसह १७ बॉलीवूड सेलिब्रिटी या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या चंद्राकरच्या लग्नात आणि सप्टेंबरमध्ये कंपनीच्या सक्सेस पार्टीला उपस्थित राहण्यासाठी किंवा परफॉर्म करण्यासाठी गेले होते, त्यामुळे हे सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. “सेलिब्रिटींनी लग्नाला उपस्थित राहण्यासाठी किंवा परफॉर्म करण्यासाठी मोबदला म्हणून मोठी रोख रक्कम स्वीकारली. हे पैसे गुन्ह्यातून मिळालेले पैसे आहेत आणि हे पैसे त्यांनी घेतले आहेत. लग्नात ते सहभागी झाल्याचं व्हिडिओंमध्ये दिसत आहे,” असंही ईडीच्या वरिष्ठ सूत्राने सांगितले.