Rani Mukerji Mardaani 3 Update : बॉलीवूडच्या सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राणी मुखर्जी. आपल्या अभिनयाने तिने गेली दोन दशकं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अशाच तिच्या गाजलेल्या भूमिकांपैकी एक म्हणजे मर्दानी सिनेमातली पोलिस अधिकारी शिवानी रॉय.
२०१४ साली आलेल्या ‘मर्दानी’ या सिनेमातनं राणी मुखर्जी पोलिस अधिकारी शिवानी रॉय भूमिकेतून मोठ्या पडद्यावर आली आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केले. ‘मर्दानी’ सिनेमाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. अशातच आता नवरात्रीच्या मुहूर्तावर ‘मर्दानी ३’ची घोषणा करण्यात आली आहे.
राणी मुखर्जी लवकरच ‘मर्दानी ३’मधून ‘शिवानी शिवाजी रॉय’ या निर्भीड पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत परतणार आहे. याआधीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता आणि आता तिसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नुकतंच सोशल मीडियावर ‘मर्दानी ३’चं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये राणी मुखर्जी आपल्या हातात बंदूक घेऊन खंबीरपणे उभी असल्याचं दिसतं.
यशराज फिल्म्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे ‘मर्दानी ३’चं पोस्टर शेअर करण्यात आलं असून या पोस्टरसह असं लिहिलं आहे की, “नवरात्रीच्या पवित्र पहिल्या दिवशी, चांगल्याचा वाईटावर झालेला विजय साजरा करूया. ‘मर्दानी ३’मध्ये राणी मुखर्जी पुन्हा एकदा पोलिस अधिकारी शिवानी रॉयच्या भूमिकेत.” या पोस्टरसह सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
‘मर्दानी ३’ सिनेमा २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. Times Now च्या वृत्तानुसार, ‘मर्दानी ३’बाबत राणी मुखर्जी म्हणाली, “पोलिसांची वर्दी घालणं आणि ही भूमिका साकारणं माझ्यासाठी नेहमीच खास राहिलं आहे. प्रेक्षकांनी या पात्राला खूप प्रेम दिलं आहे. ‘मर्दानी ३’मधून पुन्हा एकदा हे पात्र साकारणं हा देशातील नि:स्वार्थी, शूर आणि आपल्या कर्तव्याशी निष्ठावान पोलिस अधिकाऱ्यांना सलाम आहे.”
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’चं पोस्टर
दरम्यान, ‘मर्दानी ३’बाबत अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेक प्रेक्षक या सिनेमासाठी उत्सुक आहेत. तशा प्रतिक्रियासुद्धा प्रेक्षकांनी या पोस्टरखाली व्यक्त केल्या आहेत.
‘मर्दानी ३’च्या पोस्टखाली कमेंट्समध्ये, ‘खूपच उत्सुक आहोत’, ‘आजच्या दिवशी यापेक्षा कोणतीच बातमी चांगली नाही’, ‘राणी मुखर्जी पुन्हा आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणार नक्की…’, २७ फेब्रुवारी २०२६’ची आतुरतेने वाट पाहात आहोत’ या आणि अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.