शाहरुख खान आणि जुही चावला यांची जोडी प्रेक्षकांची खूप आवडती ऑनस्क्रीन जोडी होती. ९० आणि २००० च्या दशकात त्यांनी बरेच चित्रपट एकत्र केले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या जोडीने जवळपास आठ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की या दोघांचा एख सुपरहिट चित्रपट जुही चावलाआधी रवीना टंडनला ऑफर करण्यात आला होता? पण तिने नकार दिला आणि त्यात जुहीची वर्णी लागली.

हा चित्रपट म्हणजे १९९३ चा क्लासिक ‘डर’ होय. हा चित्रपट शाहरुख खानच्या करिअरमधील एक टर्निंग पॉइंट समजला जातो. या चित्रपटात जुही चावलाने केलेली किरण नावाची भूमिका आधी रवीना टंडनला ऑफर करण्यात आली होती. खुद्द रवीना टंडनने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

रवीना टंडनने ‘डर’ सिनेमाला नकार का दिला?

रवीना टंडनने नुकतेच एका पॉडकास्टमध्ये ‘डर’ चित्रपटाच्या शूटिंगच्या काही आठवणी सांगितल्या. या चित्रपटात शाहरुख खान, सनी देओल आणि जुही चावला यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. “डर सिनेमाची ऑफर सर्वात आधी माझ्याकडे आली होती. तर, तुम्ही अश्लीलतेबद्दल बोललात आणि म्हटलं की मी आधी तसे चित्रपट केले नाहीयेत का? नाही. डर सिनेमा अश्लील नव्हता, पण त्यात काही सीन्स असे होते जे मला अस्वस्थ करत होती. ‘डर’ चित्रपटाच्या सुरुवातीला काही दृश्ये होती, दोन-तीन सीन होते. मी कधीही स्विमिंग कॉस्ट्यूम घालायचे नाही. मी म्हटलेलं, ‘नाही, मी स्विमिंग कॉस्ट्यूम घालणार नाही.’ म्हणजे, काही अशी दृश्ये होती जी करण्यात मी अनकंफर्टेबल होते,” असं रवीना टंडनने नमूद केलं.

रवीनाने सांगितलं की तिला १९९१ मध्ये ‘प्रेम कैदी’ हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. तिने नकार दिल्यानंतर हा चित्रपट करिश्मा कपूरने केला. या चित्रपटातून करिश्मा कपूरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. “प्रेम कैदी हा पहिला चित्रपट होता ज्यातून लोलो (करिश्मा कपूर) हिने पदार्पण केलं होतं. तो सिनेमा आधी मला ऑफर करण्यात आला होता. पण त्यात एक सीना होता, ज्यात हिरो पँटची झिप खाली ओढतो असा काहीतरी. मला तो सीन अस्वस्थ करत होता. मी कोणाच्याही खूप जवळ जाण्यात कंफर्टेबल नसायचे, मी लोकांपासून दूर राहायचे. कदाचित तेव्हा मी थोडी गर्विष्ठ होते, आगाऊ नव्हते, कधीच नाही. मी आता जशी आहे, नेहमी तशीच होते. म्हणून लोक मला मुलासारखं वागवायचे,” असं रवीना टंडन म्हणाली.

रवीना टंडनने ‘डर’ चित्रपट केला नाही, पण तिने हिंदीत अनेक सुपरहिट सिनेमे केले आणि आपल्या अभिनयाची प्रेक्षकांवर छाप सोडली. रवीनाने अक्षय कुमारसह बऱ्याच आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलंय, पण शाहरुख खानबरोबर तिने स्क्रीन शेअर केलेली नाही.