Sachin Tendulkar Praises This Bollywood Actor : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर नेहमी कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्यामार्फत क्रीडा क्षेत्रातील असो किंवा इतर गोष्टींबाबतची त्याची मतं व्यक्त करीत असतो. अशातच आता त्यानं लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्याबद्दल प्रतिक्रिया दिली.
सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर अभिनेत्याच्या कामाचं कौतुक केलं. त्यावर अभिनेत्यानं व्यक्त होत पोस्ट शेअर केली होती. ‘महाराज’, ‘रॉकस्टार’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘रईस’ यांसारख्या कलाकृतींमध्ये काम करीत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे जयदीप अहलावत. सचिननं जयदीप अहलावतच्या कामाचं कौतुक केलं होतं.
सचिन तेंडुलकरने केलं जयदीप अहलावतचं कौतुक
सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर ‘आस्क मी’ हे सेशन घेतलं होतं, ज्यादरम्यान त्याला एकानं जयदीपबद्दल विचारलं होतं. त्या नेटकऱ्यानं जयदीपबद्दल सचिनला विचारलेलं की, “जयदीपनं अनेकदा तुमचं खूप कौतुक केलं आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं?” त्यावर सचिननं, “तो एक उत्तम कलाकार आहे. मला त्याचं काम खूप आवडतं. ‘पाताल लोक’मध्ये त्याने हाथीरामची भूमिका खूप छान साकारली”, असं उत्तर दिलं.
जयदीपनं तो स्क्रीन शॉट बुधवारी (२७ ऑगस्ट) पोस्ट करीत लिहिलं, “सर, असं करू नका. कोणाला तरी आनंदानं वेड लागेल. खूप खूप धन्यावद सर. ही आठवण मी आयुष्यभर जपून ठेवेन.” पुढे त्यानं लिहिलं, “मी स्वप्न तर बघत नाहीये ना? धन्यवाद सर.”

जयदीप अहलावतनं ‘पाताल लोक’मध्ये हाथीराम चौधरी ही भूमिका साकारलेली. त्यानं ही भूमिका खूप उत्कृष्टरीत्या साकारली आहे. त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी ती एक मानली जाते. त्यामध्ये त्यानं पोलिसाची भूमिका साकारलेली, जो कर्तव्य आणि भ्रष्टाचार यामध्ये अडकलेला असतो.
जयदीप अहलावतबद्दल बोलायचं झालं, तर त्याचं ‘नेटफ्लिक्स’वर आलेल्या ‘महाराज’ या चित्रपटातील भूमिकेसाठीही अनेकांनी कौतुक केलं होतं. त्यामध्ये अभिनेत्री शर्वरी वाघ, जुनैद खान हे कलाकार मुख्य भूमिकांत होते. यासह त्याने आजवर ‘पाताल लोक’व्यतिरिक्त ‘खट्टा मिठ्ठा’, ‘आक्रोश’, ‘रॉकस्टार’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘रईस’, ‘राझी’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘महाराज’ यांसारख्या कलाकृतींमध्ये काम केलं आहे.