Sachin Tendulkar reviews Sitaare Zameen Par आमिर खान लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सितारे जमीन पर’ २० जून २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे. या सिनेमाच्या ट्रेलरलादेखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जिनिलीया देशमुखदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. आमिर खान बास्केटबॉल कोचच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अभिनेता आमिर खान व जिनिलीया देशमुख चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अनेक मुलाखतींमधून हे कलाकार व्यक्त होताना दिसत आहेत.

नुकतीच आमिर खानने ‘जस्ट टू फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत आमिर खानने सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर यांच्याबद्दल वक्तव्य केले. आमिर खान म्हणाला की सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी त्याला फोन केला आणि विचारले की ते ‘सितारे जमीन पर’ प्रदर्शित होण्यापूर्वी पाहू शकतात का? कारण- जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल, तेव्हा ते दौऱ्यावर असतील. आमिर खानने त्यांना तो चित्रपट दाखवला. अंजली व सचिन तेंडुलकर यांनी चित्रपट पाहिला. संपूर्ण कास्टची भेट घेतली. चित्रपट पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरने चित्रपटाबद्दल त्याचे मत मांडले त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांचे आणि कलाकारांचे कौतुक केले.

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

‘आमिर खान टॉकिज’ने युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर म्हणाला, “मला हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटामध्ये ‘सितारे जमीन पर’च्या संपूर्ण टीमबरोबर तुम्हाला हसवण्याची आणि रडवण्याची ताकद आहे. मी नेहमीच म्हणतो की खेळांमध्ये आपल्याला खूप काही शिकवण्याची ताकद असते. लोकांना एकत्र आणण्याचा संदेश या चित्रपटातून मिळतो. सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा, असे म्हणत सचिन तेंडुलकरने चित्रपटाचे कौतुक केले आहे. याआधी सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले होते.

आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान , जिनिलीया देशमुख यांच्यासह आरुष दत्ता, गोपी कृष्णन वर्मा, वेदांत शर्मा, नमन मिश्रा, ऋषी शहानी, ऋषभ जैन आणि आशिष पेंडसे यांच्या भूमिका आहेत. दिव्य सिद्धी शर्मा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. आमिर आणि अपर्णा पुरोहित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे संगीत शंकर-एहसान-लॉय यांनी दिले आहे तर गीते अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली आहेत.

दरम्यान, आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. २००७ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले होते. आता ‘सितारे जमीन पर’ला प्रेक्षकांचा काय प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.