Saif Ali Khan on ex wife Amrita Singh: अभिनेता सैफ अली खान हा ‘हम तुम’, ‘दिल चाहता है’, ‘रेस’, ‘रंगून’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी ओळखला जातो. आजही तो विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो.
अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे तर १९९१ मध्ये त्याने बॉलीवूड अभिनेत्री अमृता सिंह बरोबर लग्नगाठ बांधली होती. त्यांना सारा व इब्राहिम ही दोन मुले आहेत. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यांनी २००४ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर सैफ अली खानने २०१२ मध्ये अभिनेत्री करिना कपूरबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना जेह व तैमूर ही दोन मुले आहेत.
आता सारा व इब्राहिम हे बॉलीवूडमध्ये काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सैफ अली खान अनेकदा त्याच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतो. आता अभिनेत्याने नुकतेच त्याचे एक्स पत्नीबरोबर कसे संबंध आहेत यावर वक्तव्य केले आहे.
“तिचे माझ्या आयुष्यातील…”
सैफ अली खानने नुकतीच ‘टू मच विथ काजोल व ट्विंकल’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अमृता सिंह बरोबरच्या नात्याबद्दल सैफ अली खान म्हणाला, “मी याआधीही या विषयावर खूप बोललो आहे. जेव्हा माझे आणि अमृताचे लग्न झाले, तेव्हा मी २१ वर्षांचा होतो. आयुष्यात गोष्टी बदलतात. आमचे लग्न दीर्घकाळ टिकू शकले नाही. आम्हाला दोन छान मुले आहेत.”
“मला वाटत नाही की मी याआधी कधी बोललो आहे, पण अमृता माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होती. चित्रपटसृष्टीतील वाटचाल कशी करावी हे तिने समजावून सांगितले, तिच्यामुळे अनेक गोष्टी समजल्या. त्यावेळचे तिचे माझ्या आयुष्यातील योगदान आणि तिने केलेली मदत ही खूप अमूल्य होती. हे दुर्दैव आहे की गोष्टी यशस्वी झाल्या नाहीत.”
सैफचे बोलणे ऐकल्यानंतर काजोल म्हणाली, “तिने तुला खूप उत्तम पद्धतीने मोठे केले”, त्यावर सैफ म्हणाला, “मी आधी सांगितल्याप्रमाणे मी खूप गोष्टी शिकलो. ती खूप चांगली आई आहे, पण मी खूप नशीबवान आहे. मला वाटतं की आजही आमच्यात चांगलं नातं आहे. आम्ही कधीतरी महत्त्वाच्या गोष्टींबाबत एकमेकांशी बोलतो. अनेकदा मी जेव्हा आजारी असतो, हॉस्पिटलमध्ये असतो, तेव्हा आमच्यात बोलणे होत असते.” पुढे हसत तो म्हणाला की मी सतत आजारी पडत असतो, त्यामुळे आम्ही सतत संपर्कात असतो.
सैफ अली खानच्या कामाबाबत बोलायचे तर तो सध्या ‘हैवान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तो लवकरच ‘रेस ४’ चेदेखील शूटिंग सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. आता या चित्रपटांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे महत्त्वाचे आहे.