Saiyaara box office collection day 10: ‘सैयारा’ हा चित्रपट १८ जुलै २०२५ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. २०२५ मध्ये सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असा हा चित्रपट आहे.
मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे कोणताही सुप्रसिद्ध कलाकार या चित्रपटात नसताना या चित्रपटाने एवढी कमाल केल्याचे दिसत आहे. या चित्रपटातून अभिनेता अहान पांडेने पदार्पण केले आहे. तर अनित पड्डा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. अनितने या आधी काही जाहिराती आणि काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ने किती केली कमाई?
आता या चित्रपटाने १० दिवसांत एकूण किती कमाई केली आहे, ते जाणून घेऊयात. ‘सैयारा’ने नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारी २६.५ कोटींची कमाई केली होती. तर, दहाव्या दिवशी या चित्रपटाने ३० कोटींची कमाई केली आहे.
‘सॅल्कनिक’नुसार, या चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन २४७.२५ कोटी इतके झाले आहे. तर संपूर्ण जगभरात या चित्रपटाने ३०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने आधीच काही चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’ने भारतात १९८.४१ कोटींची कमाई केली होती. अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रेड २’ने १७९.३० कोटींची कमाई केली आहे. तर आमिर खान व जीनिलीया देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘सितारे जमीन पर’ने १६५.८५ कोटींची कमाई केली आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने ६१५.३९ कोटींची कमाई केली होती. ‘सैयारा’ची आताची कमाई पाहता, हा टप्पा मोठा आहे. मात्र, आगामी काळात चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद असाच कायम राहिला, तर हा चित्रपट ‘छावा’ला मागे टाकू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार २’ आणि सिद्धांत चतुर्वेदी व तृप्ती डिमरी यांचा ‘धडक २’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटांचा ‘सैयारा’च्या कमाईवर काही परिणाम होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, सैयारा हा चित्रपट पाहताना अनेक प्रेक्षक मोठमोठ्याने रडत असल्याचे, बेशुद्ध पडल्याचे, त्यांनी स्वत:चेच कपडे फाडल्याचे, अनेक जण दु:खात बुडाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता आगामी काळा हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.