Salim Khan is a big critic of Salman Khan: अभिनेता आसिफ शेख हा ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून लोकप्रिय ठरला. या मालिकेतील विभूती या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खान कुटुंबाबरोबर असलेल्या बॉण्डिंगबाबत त्याने वक्तव्य केले.
सलीम खान व सलमान खानबद्दल अभिनेता काय म्हणाला?
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने सलीम खान यांच्याबरोबरच्या काही आठवणी सांगितल्या. त्यांच्याबरोबर साधलेले संवाद, खान कुटुंबाच्या पार्टीला लावलेली हजेरी याबद्दल अभिनेत्याने सांगितले. तसेच, सलमान जेव्हा त्याच्या वडिलांच्या अवतीभोवती असतो, तेव्हा त्याचे वागणे कसे असते, याबरोबरच सलीम खान सलमानवर मोठ्या प्रमाणात टीका करतात, असाही खुलासा अभिनेत्याने केला.
अभिनेता म्हणाला, “मी अनेकदा सलीम खान यांच्या फार्महाउसवर जात असे. त्यांच्याबरोबर वेळ घालवत असे. त्यांचा जावई अतुल अग्निहोत्री आणि मी चांगले मित्र आहोत. आम्ही सलीम खान यांच्याबरोबरच बराच वेळ घालवत असू. त्यांच्याकडे सांगण्यासाठी खूप मजेशीर गोष्टी असत. त्यांची विनोद बुद्धी उत्तम आहे. अमिताभ बच्चन यांना कसे त्यांच्या चित्रपटात कास्ट केले, याबद्दलचा किस्सा त्यांनी मला सांगितला होता.”
पुढे याच मुलाखतीत आसिफ शेखने असेही सांगितले की, सलमान त्याच्या वडिलांचा खूप आदर करतो. तो म्हणाला, “सलीम खान सलमानवर खूप टीका करतात. त्यांचा मुलगा स्टार आहे म्हणून ते गोड बोलतात, असे नाही. ते स्पष्ट शब्दांत त्यांना न पटलेल्या गोष्टी सलमानला सांगतात. सलमान खानचे सर्वांत मोठे टीकाकार सलीम खान आहेत. सलीम खान यांच्यापुढे बोलण्याची सलमानची हिंमत नाही. तो त्याच्या वडिलांचा खूप आदर करतो. मला आठवते की, जेव्हा सलमान तरुण होता. त्यावेळी तो मोठा स्टार झाला होता. तरीही जेव्हा सलीम खान यांच्याबरोबर बोलताना तो अडखळत असे.”
सलीम खान यांनी एक सल्ला दिला होता. त्याबद्दल अभिनेता म्हणाला, “सलीम खान एकदा आम्हाला म्हणाले होते. जर तुम्हाला एखादी व्यक्ती कशी आहे, हे जाणून घ्यायचे असेल. तर तुम्ही हे जाणून घ्या की, त्याचे किती मित्र किती जुने आहेत, त्याचे नोकर-चाकर आणि त्यांचे फोन नंबर किती जुने आहेत, हे बघा.”
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे, तर अभिनेता सध्या बिग बॉस १९ चे सूत्रसंचालन करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, सध्या तो बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आता हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.