Varinder Singh Ghuman Passed Away due to Heart Attack : लोकप्रिय अभिनेता, पंजाबचा ‘आयर्नमॅन’ व आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर वरिंदर सिंग घुमन याचे निधन झाले आहे. वरिंदर फक्त ४१ वर्षांचा होता. शस्त्रक्रियेदरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली.
वरिंदरला बायसेप्सशी संबंधित त्रास होता, त्यामुळे त्याच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी तो अमृतसरमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल झाला होता. शस्त्रक्रिया फार मोठी नसल्याने तो घरातून एकटाच रुग्णालयात गेला होता. पण शस्त्रक्रियेदरम्यान अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले. वरिंदर घुमनच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण पंजाबी इंडस्ट्रीवर शोककला पसरली आहे. अभिनेत्याचे चाहतेही धक्क्यात आहेत.
मित्राच्या निधनाची पोस्ट ठरली शेवटची
पंजाबी गायक राजवीर जवंदा याचे निधन झाले. अपघातात जखमी झालेल्या राजवीवर अनेक दिवस उपचार सुरू होते. पण त्याची प्रकृती खालवत गेली आणि त्याचे निधन जाले. राजवीर हा वरिंदर सिंग घुमनचा चांगला मित्र होता. वरिंदरने राजवीरच्या श्रद्धांजलीची पोस्ट केली होती. हीच त्याची शेवटची पोस्ट ठरली. या पोस्टनंतर थेट वरिंदरच्या निधनाची बातमी आली.
वरिंदर सिंग घुमन हा अभिनेता असण्यासोबतच एक बॉडीबिल्डर देखील होता. वरिंदर घुमनने मिस्टर एशिया स्पर्धेत भाग घेतला होता, तिथे तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. २०११ मध्ये, त्या ऑस्ट्रेलियन ग्रां प्रिक्समध्ये यश मिळालं होतं. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही भाग घेतला होता.
वरिंदरला फक्त फिटनेस नाही तर अभिनयाची देखील खूप आवड होती. त्याने काही पंजाबी व हिंदी चित्रपट केले होते. ‘कबड्डी वन्स अपॉन’ या पंजाबी चित्रपटाने वरिंदरला खूप लोकप्रियता मिळवून दिली. हा त्याचा पदार्पणाचा चित्रपट होता. वरिंदरने ‘रोअर-टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’मधून बॉलीवूड पदार्पण केले होते. यानंतर तो ‘मरजावां’मध्ये झळकला होता. घुमन सलमान खानचा मोठा चाहता होता. त्याने सलमान खानबरोबर ‘टाइगर 3’ मध्ये काम केलं होतं. वरिंदरने बॉबी देओल, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, करीना कपूर खान व सलमान खानबरोबर काम केलं होतं.