Salman Khan Is A Gunda Says Dabangg Director : सलमान खान व्यावसायिक आयुष्यासह त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. अभिनेता अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे. अशातच आता त्याच्या एका सुपरहिट चित्रपटाच्या दिग्दर्शकाने त्याच्याबद्दल गंभीर वक्तव्य केलं आहे.
२०१० साली आलेल्या ‘दबंग’मध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासह यामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकलेली. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. परंतु, माध्यामांच्या माहितीनुसार त्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सलमान खान व दिग्दर्शकामध्ये तणावपूर्वक वातावरण निर्माण झालेलं.
सलमान खानबद्दल दिग्दर्शकाची प्रतिक्रिया
‘स्क्रीनशी’ संवाद साधताना चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यपने याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तो म्हणाला, “सलमान कधीच मिळून मिसळून राहात नाही. गेल्या २५ वर्षांपासून त्याला अभिनयातही रस नाहीये, तो काम करून स्वत:वर उपकार करतो. त्याचा सेलिब्रिटीकडे असलेल्या पॉवरकडे जास्त कल आहे, पण त्याला अभिनयात रस नाही. तो गुंड आहे. मला याबद्दल दबंग करण्यापूर्वी माहीत नव्हतं. तो बेशिस्त आहे, घाणेरडा माणूस आहे.”
सलमान खानच्या कुटुंबावर दिग्दर्शकाने केली टीका
अभिनव कश्यप पुढे म्हणाला, “तो बॉलीवूडमधील स्टार सिस्टमचा करताधरता आहे. तो अशा कुटुंबातून आहे, जे गेल्या ५० वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे. ते सुडबुद्धीने वागणारे लोक आहेत. तुम्ही जर त्यांच्या मताशी सहमत झाला नाहीत तर ते तुमच्या मागे लागतात, त्यांना लोकांना त्यांच्या ताब्यात ठेवायचं असतं.”
अभिनव पुढे म्हणाला, “अनुरागने या चित्रपटातून माघार घेतली. त्याने ‘तेरे नाम’ची स्क्रीप्ट लिहिलेली. बोनी कपूरने त्याच्याबरोबर गैरवर्तन केलं, मग त्याने यामधून माघार घेतली. त्यांनी त्याला त्याच्या कामाचं श्रेय दिलं नाही. अगदी तसंच माझ्याबाबतीतही घडलं. कुठल्याही चित्रपटाचा महत्त्वाचा भाग त्याची संहिता असते.”
दरम्यान, सलमान खानने आजवर कधीही अभिनव कश्यपने त्याच्या कुटुंबीयांवर व त्याच्यावर केलेल्या टीकेबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.