Salman Khan Is God Says Bollywood Choreographer : बॉलीवूड अभिनेता सलमान खाननं आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. त्यामुळे जगभरात त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. सलमान खानचा गोड स्वभावही अनेकांच्या पसंतीस पडतो. तसेच सलमान एखाद्याला मदत करण्यासाठी कायमच तत्पर असतो. त्याशिवाय त्याच्या मैत्रीचेही अनेक किस्से आहेत. अनेकांकडून सलमान खानचं कौतुक होत असतं. अशातच प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकानं सलमानला साक्षात देव म्हटलं आहे.

‘Friday Talkies’सोबतच्या एका संभाषणात बॉलीवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक चिन्नी प्रकाश यांनी सांगितलं, “मी सलमानबरोबर त्याच्या दुसऱ्या चित्रपटापासूनच काम केलं. गोविंदानंतर मी सलमानबरोबरच सर्वाधिक चित्रपट केले. माझ्या दृष्टीने तो निर्मळ मनाचा आहे. त्याचं हृदय खूप मोठं आहे. तो माणूस म्हणून खूपच चांगला आहे.”

चिन्नी प्रकाश यांनी पुढे सांगितलं, “जेव्हा जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं, तेव्हा तेव्हा मी त्याला ‘सलमान, मला काम पाहिजे’ असा मेसेज पाठवायचो. त्यावर तोही लगेच प्रतिसाद द्यायचा. मला अजूनही आठवतं की, मी थायलंडमध्ये एक दाक्षिणात्य सिनेमा करीत होतो. मी त्याला ‘काम पाहिजे’ हा मेसेज पाठवला आणि शूटिंग करत राहिलो. त्यानंतर मी ते विसरून गेलो. नंतर काही दिवसांनी मला त्याचा फोन आला आणि तो म्हणाला, ‘तुम्ही लगेच या, तुमचं ‘बिग बॉस’च्या दिग्दर्शनाचं काम सुरू होईल. शो सुरू होतोय, तुम्ही दिग्दर्शक व्हा, परत या.’ तो असाच आहे. तो खरंच खूप चांगला आहे. त्याची दुसऱ्या कोणाशीच तुलना होऊ शकत नाही.”

चिन्नी प्रकाश पुढे म्हणाले, “जर कोणाला मदतीची गरज असेल, तर सलमान पहिला मदतीसाठी धावून येतो. बाकी लोकांसाठी तो कसा आहे, मला माहीत नाही. माझ्या मदतीला तर तो नक्कीच धावून आला आहे. जर तुमच्याकडे काम नसेल, पैशांची गरज असेल, तर तो कायम तुमच्यासाठी उभा राहील. मी त्याला, त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या भावांना त्याच्या दुसऱ्या चित्रपटापासूनच ओळखतो.”

शेवटी चिन्नी प्रकाश म्हणाले, “सलमान माझ्यासाठी देव आहे. त्यानं मला दिग्दर्शनाच्या ऑफर्स दिल्या. मी त्या ऑफरला नकार दिला; पण तो अजूनही मला दिग्दर्शनासाठी कॉल करतो, जरी त्या सिनेमाचा दिग्दर्शक असला तरी. प्रत्येकाकडे मनाचा मोठेपणा असू शकत नाही, जो सलमानकडे आहे. बाकी इतर कुणाच्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही; पण माझ्यासाठी सलमान एक देवदूत आहे.”