Sikandar Movie Release Date : ए.आर.मुरुगदॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. १८ मार्चला ‘सिकंदर’ चित्रपटाचं नवं गाणं प्रदर्शित झालं. या चित्रपटातील नव्या गाण्याचं नाव ‘सिकंदर नाचे’ असं असून यामध्ये ५९ वर्षीय सलमान खानने जबरदस्त डान्स केला आहे. तसंच यामध्ये भाईजान व रश्मिका मंदानाची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ‘सिकंदर नाचे’ या गाण्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

आतापर्यंत ‘सिकंदर’ चित्रपटाचे बरेच पोस्टर्स, दोन टीझर, गाणी प्रदर्शित झाली. त्यामध्ये चित्रपट ईद २०२५मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं नमूद केलं आहे. पण, आता प्रदर्शनाची निश्चित तारीख समोर आली आहे. ‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, सलमान खान व रश्मिका मंदानाचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपट रविवार ३० मार्चला प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांच्या मते ३० मार्च ही प्रदर्शनाची तारीख योग्य आहे. कारण ३० मार्चला रविवार आहे. तर ३१ मार्च आणि १ एप्रिलला ईद आहे. रमजानमुळे मुस्लिम प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग ईदच्या पूर्वी चित्रपटगृहापासून दूर असतो. त्यामुळे निर्मात्यांचा प्लॅन आहे की, ३० मार्चला रविवार सुट्टी असल्यामुळे ‘सिकंदर’ पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करू शकतो. त्यानंतर भाईजानचे चाहते ‘सिकंदर’ चित्रपट पाहून ईद साजरी करतील.

याशिवाय ३० मार्च रविवार ‘सिकंदर’ चित्रपटासाठी अजून एक मोठी संधी आहे. ३० मार्चला गुढीपाडवा आहे. सोमवारी ३१ मार्चला ईद साजरी केली जाणार आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी १ एप्रिल व २ एप्रिलला सुट्टी आहे. ४ एप्रिलला वीकेंड सुरू होईल. त्यामुळे ६ एप्रिलपर्यंत सलमान खानचा हा चित्रपट जबरदस्त कमाई करू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपटाचा अजूनपर्यंत ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही. पण, लवकरच अ‍ॅडवान्स बुकिंग सुरू होणार आहे. परदेशात ‘सिकंदर’ चित्रपटाची अ‍ॅडवान्स बुकिंग २४ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ३० मार्चसाठी परदेशात अ‍ॅडवान्स बुकिंग होतं आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.