सलमान खान ५९ वर्षांचा आहे. लवकरच तो ६० वर्षांचा होईल. सलमान खानने लग्न केलेलं नाही, पण अनेक अभिनेत्रींबरोबर तो रिलेशनशिपमध्ये होता. सलमानला आता लग्न करायचं नाही, पण त्याला बाबा व्हायचं आहे. त्याने स्वतः याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच आधीची नाती टिकू शकली नाही, त्याचा दोष त्याने स्वतःला दिला.

‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ च्या पहिल्या भागात सलमान खान आणि आमिर खान हजेरी लावणार आहेत. या शोसंदर्भातील एका प्रेस नोटनुसार, सलमान खान या भागात त्याच्या मागील नातेसंबंधांबद्दल आणि मुलांबद्दल चर्चा करताना दिसणार आहे. तसेच आमिर त्याच्या व सलमानच्या मैत्रीबद्दल बोलणार आहे.

दोघांनी एकत्र पुढे जाणं गरजेचं – सलमान खान

सलमान खान म्हणाला, “जेव्हा एक जोडीदार दुसऱ्यापेक्षा जास्त प्रगती करतो, तेव्हाच खऱ्या अडचणी सुरू होतात. नंतर असुरक्षिततेची भावना मनात घर करू लागते. त्यामुळे दोघांनीही एकत्र पुढे जाणं गरजेचं आहे. त्यांनी एकमेकांचं ओझं कमी करायला हवं, असं मला वाटतं.” जेव्हा आमिर खानने सलमानला त्याच्या जुन्या नात्यांबद्दल विचारलं तेव्हा सलमान खानने ती नाती न टिकण्यासाठी स्वतःला जबाबदार धरलं.

मीच जबाबदार – सलमान खान

सलमान खान नात्यांबद्दल म्हणाला, “नाही टिकली नाही, मला नाही जमलं. त्यासाठी कोणी जबाबदार असेल तर मीच आहे.” त्यानंतर सलमानने बाबा व्हायची इच्छा व्यक्त केली. “मला लवकरच मुलं होतील. एक दिवस माझी मुलं असतील,” असं सलमान खानने नमूद केलं.

सलमानबरोबरच्या मैत्रीबद्दल आमिर म्हणाला…

पहिल्या घटस्फोटानंतर आमिरची सलमानशी मैत्री घट्ट झाली. आमिरने स्वतः याबदद्ल सांगितलं. “मला वाटतं हे माझा रीनाशी घटस्फोट झाल्यानंतर आपण चांगले मित्र झालो. तुला आठवतंय का? तू जेवायला आला होतास. तेव्हाच सलमान आणि माझं पहिल्यांदाच चांगलं समीकरण जुळलं. कारण त्याआधी मला वाटायचं, ‘भाई कधीच वेळेवर येत नाही’ आणि ‘अंदाज अपना अपना’ मध्ये आम्हाला खूप अडचणी येत होत्या. म्हणून मला म्हणायचंय की सलमान सुरुवातीला मी खूप जजमेंटल होतो. मी एक व्यक्ती म्हणून खूप कडक होतो,” असं आमिर खान भाईजानला म्हणाला.