सलमान खान व ऐश्वर्या राय यांच्यातील ब्रेकअपची २००२ मध्ये प्रचंड चर्चा झाली होती. ब्रेकअपनंतर सलमानने सतीश कौशिक यांच्या ‘तेरे नाम’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. यात त्याने प्रेमभंग झालेल्या एका प्रियकराची भूमिका केली होती. प्रसिद्ध गीतकार समीर अंजान यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैयक्तिक आयुष्यात प्रेमभंग झाल्याने त्याचा प्रभावही सलमानच्या अभिनयात दिसून आला. सलमान ‘तेरे नाम’ शीर्षकगीत ऐकताना अनेकदा अस्वस्थ व्हायचा.
शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत समीर अंजान म्हणाले, “आम्ही तेरे नामचे शीर्षकगीत सलमान खानसाठी लिहिले नव्हते. पण ऐश्वर्या रायबरोबर ब्रेकअप झाल्याने हे गाणं त्याच्या वैयक्तिक प्रेमभंगावर आधारित आहे, असं वाटू लागलं. त्या गाण्याचे शूटिंग करण्यापूर्वी, सलमान हिमेश रेशमियाला फोन करायचा, त्याला ते गाणं गायला सांगायचा आणि नंतर खूप रडायचा.”
हिमेश गाणं गायचा आणि सलमान रडायचा
समीर पुढे म्हणाले, “सलमानला प्रचंड त्रास होत होता. त्याच्या ब्रेकअपच्या जखमा अजूनही ताज्या होत्या. सेटवर असताना, शॉट देण्यापूर्वी, हिमेश गाणं गायचा आणि सलमान रडायचा. हे गाणं – खासकरून ‘क्यों किसीको वफा के बदले वफा नही मिलती’ ही ओळ – ऐश्वर्यापर्यंत पोहोचावी अशी सलमानची खूप इच्छा होती, जेणेकरून तिला त्याचं दुःख समजू शकेल.”
बॉलीवूडमधील दुसऱ्या ब्रेकअपची गोष्ट
समीर अंजान यांनी चित्रपट निर्मितीवर परिणाम करणाऱ्या आणखी अशाच एका हाय-प्रोफाइल ब्रेकअपबद्दल सांगितलं. ‘मिलेंगे मिलेंगे’चे चित्रीकरण पूर्ण होण्यापूर्वीच शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचं ब्रेकअप झालं, त्यामुळे निर्माते बोनी कपूर चिंतेत होते.
समीर म्हणाले, “शाहिद आणि करीनाचं ब्रेकअप झालं तेव्हा एक गाणं शूट करायचं बाकी होतं. बोनी कपूर तणावात होते, चित्रपट कधी पूर्ण होईल की नाही याची त्यांना खात्री नव्हती. ते माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारलं की मी असं गाणे लिहू शकतो का? जे दोन्ही कलाकारांना त्यांच्या स्वतःच्या कथेसारखं वाटेल.”
समीर यांनी शाहिद व करीनासाठी ‘कुछ तो बाकी है’ गाणं लिहिलं. “गाण्याचे बोल बोनी कपूर यांना आवडले. या गाण्यामुळे शूटिंग पुन्हा ट्रॅकवर आलं आणि दोघांनी ते शूटिंग पूर्ण केलं होतं.”
शाहिद व करीनाने एकत्र डबिंग करण्यास नकार दिल्याने त्यांच्या ब्रेकअपनंतर ‘मिलेंगे मिलेंगे’ चित्रपट तयार व्हायला वेळ लागला. २००४ मध्ये या सिनेमाचं काम सुरू झालं होतं, तो तब्बल ६ वर्षांनी रिलीज झाला होता. २००७ मध्ये इम्तियाज अली यांच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करीना आणि शाहिद यांचे ब्रेकअप झाले होते.