सलमान खान व कतरिना कैफ यांचा बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीच्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रदर्शित झाला. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. रविवारची सुट्टी असल्याने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ नंतर सलमान व कतरिनाच्या स्पाय चित्रपटासाठी प्रेक्षक किती गर्दी करणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

नुकतंच ‘टायगर ३’ने एक नवा रेकॉर्ड रचल्याचं स्पष्ट झालं आहे. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘टायगर ३’ हा दिवाळीच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल ९४ कोटींची कमाई केली आहे. यापैकी भारतातील एकूण कमाई ही ५२.५० कोटी असून बाहेरील देशांमध्ये या चित्रपटाने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तब्बल ४१.५० कोटींची कमाई केली आहे. बऱ्याच ठिकाणी या चित्रपटाची तिकिटे ब्लॅकमध्ये विकली जात असून यासाठी खास मध्यरात्रीचे शोजसुद्धा लावण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : सलमान खानचा ‘टायगर ३’ न पाहण्याची चार कारणं कोणती? जाणून घ्या

‘कोईमोई’च्या रीपोर्टनुसार सिंगल स्क्रीन थिएटर्स ‘टायगर ३’मुळे चर्चेत आली आहेत. मुंबईच्या गेटी गॅलक्सिसह इतरही सिंगल स्क्रीन थिएटरबाहेर ‘टायगर ३’ची तिकिटे ब्लॅकमध्ये मिळायला सुरुवात झाली आहे. १४० रुपयांचं तिकीट २४० पेक्षा अधिक दरात म्हणजेच तब्बल ७०% हून अधिक जास्त किंमतीने ‘टायगर ३’ची तिकीटे ब्लॅकमध्ये विकली जात असल्याची चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच मुंबईसह इतर ठिकाणीही ‘टायगर ३’चे मध्यरात्रीपासूनच शोज आयोजित केले जाणार आहेत. रात्री १२ पासून हे शोज ठेवणार असल्याची चर्चा आहे. आधीच चित्रपटाचे सकाळचे ६ व ७ वाजताचे शो हाऊसफुल्ल होत असल्याने आता याचे मध्यरात्रीपासून शोज ठेवायचा निर्णय काही चित्रपटगृहाच्या मालकांनी घेतला आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमानसह कतरिना कैफ, इम्रान हाशमी, विशाल जेठवा, रेवती, कुमुद मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तसेच चित्रपटातील शाहरुखच्या कॅमिओचीही जबरदस्त चर्चा आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीनही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.