Sanjay Dutt on Salman Khan: अभिनेता संजय दत्त नुकताच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. ‘जंग’, ‘कुरुक्षेत्र’, ‘चल मेरे भाई’, ‘हसीना मान जाएगी’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ अशा अनेक चित्रपटांतील त्याच्या भूमिका मोठ्या प्रमाणात गाजल्या.
संजय दत्तने आजवर अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. अनेक समकालीन कलाकारांबरोबरचे त्याचे चित्रपट हिट ठरले आहेत. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत सलमान खान व अर्शद वारसी या अभिनेत्यांबरोबरच्या मैत्रीबाबत वक्तव्य केले आहे.
संजय दत्तने नुकतीच कर्ली टेल्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत संजय दत्तने त्याच्या आयुष्यातील दोघं सलमान खान व अर्शद वारसी यांच्याबद्दल वक्तव्य केले.
सलमान खानचे कौतुक करत संजय दत्त म्हणाला, “सलमान खूप चांगला, प्रेमळ व्यक्ती आहे. तो माझ्या लहान भावासारखा आहे. मी त्याच्यापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही, तो माझा भाऊ आहे.”
सलमान खान व संजय दत्त यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. ‘दस’, ‘साजन’, ‘चल मेरे भाई’ अशा अनेक चित्रपटांचा त्यात समावेश आहे. ‘सिंकदर’ चित्रपटाच्या प्रीमिअरवेळी सलमान खानने संजय दत्तबरोबर चित्रपट काढणार असल्याची घोषणा केली होती. तसेच, हा अॅक्शन चित्रपट असेल असेही सांगितले होते. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही.
पुढे अर्शद वारसीबद्दल संजय दत्त म्हणाला, “तो माझा सर्किट आहे. तो सर्वोत्तम व्यक्तींपैकी एक आहे. त्याचे विनोदाचे टायमिंग अविश्वसनीय आहे, तो खूप गोड आणि खरा मित्र आहे.”
संजय दत्तने अर्शद वारसीबरोबर राजकुमार हिरानी यांच्या ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्ना भाई’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटतील मुन्ना भाई आणि सर्किटची ऑनस्क्रीन जोडी बॉलीवूडमधील सर्वात गाजलेल्या जोडींपैकी एक आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांच्यातील मैत्रीने लक्ष वेधून घेतले होते. खऱ्या आयुष्यातही त्यांची मैत्री तशीच असल्याचे दिसते.
संजय दत्त व अर्शद वारसी हे लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी, रवीना टंडन, दिशा पटानी असे अनेक लोकप्रिय कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, याशिवाय संजय दत्त ‘धुवाँधार’ या चित्रपटातदेखील दिसणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन, अक्षय खन्ना हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.