Sanjeev Kumar’s friends abandoned him: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते संजीव कुमार यांनी विशीत असतानाच बॉलीडमध्ये पदार्पण केले. १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘हम हिंदुस्तानी’ या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. १९६५ साली प्रदर्शित झालेल्या निशान या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

अल्पावधीतच संजीव कुमार यांना मोठी लोकप्रियता मिळाली. ते ज्या पद्धतीने भूमिका साकारत असत, त्याचे कौतुक झाले. ते पूर्ण समर्पित होऊन भूमिका साकारत असत. त्यांचे समकालीन कलाकार हे ग्लॅमरस भूमिका निवडत असत. अॅक्शन हीरोच्या भूमिकांना प्राधान्य देत असत. पण, संजीव कुमार मात्र अर्थपूर्ण भूमिका साकारण्यास प्राधान्य देत असत. त्यांनी कमी वयातदेखील वडिलांच्या भूमिका साकारल्या.

संजीव कुमार यांचे खाद्यप्रेमदेखील प्रसिद्ध होते. ते दररोज रात्री त्यांच्या मित्रांना जमा करायचे आणि त्यांचे आवडते खाद्यपदार्थ खायचे, दारू प्यायचे. त्यांचा जन्म अशा गुजराती कुटुंबात झाला होता, जे शाहाकारी होते. संजीव कुमार यांना मांसाहार आवडत असे. ते त्यांना इतके आवडत असे की, पाली हिलमध्ये मांसाहार करण्यासाठी त्यांचे वेगळे घर होते, जेणेकरून ते तिथे मांसाहाराचा आनंद घेऊ शकतील. मात्र, त्यांची ज्या पद्धतीची जीवनशैली होती, त्याचा त्यांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला.

वर्षानुवर्षे ते अतिप्रमाणात दारूचे सेवन करीत असत. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा सामना करावा लागला, शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना दारू सोडण्याचा सल्ला दिला. संजीव कुमार यांनी डॉक्टरांचा हा सल्ला मान्य केला होता; मात्र त्यांचा हा निर्णय त्यांना महागात पडला.

“संजीव कुमार खूप…”

लेखक हनीफ झवेरी व संजीव कुमार यांची भाची जिग्ना यांनी नुकतीच विकी लालवाणीला मुलाखत दिली. या मुलाखतीत जिग्ना म्हणाली, “संजीव कुमार यांचे सर्व मित्र दररोज संध्याकाळी त्यांच्याबरोबर दारू प्यायला येत असत. शस्त्रक्रियेनंतर त्याने दारू पिणे बंद केल्यानंतर ते सगळे संजीव कुमार यांच्या आयुष्यातून अचानक गायब झाले. त्यापैकी कोणीही त्यांची चौकशी करायलाही आले नाही. त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला.”

संजीव कुमार यांना अनेक जण कंजूष, असे म्हणत असत. पण, हे सर्व त्यांच्याबद्दलचे गैरसमज होते, असे वक्तव्य हनीफ झवेरी यांनी केले. ते म्हणाले, “असे लोक आहेत, जे संजीव कुमार यांना कंजूष असे म्हणत होते; पण त्यांना सत्य माहीत नाही. संजीव कुमार खूप उदार मनाचे होते. त्यांनी मित्रांना गाड्या भेट दिल्या. दिलीप दत्त आणि त्यांच्या व्यवस्थापक जमनादाससाठी घर विकत घेतले. ते त्याच्या मित्रांसाठी जगले; परंतु कोणीही त्यांना कधीच समजून घेतले नाही.”

जिग्ना पुढे म्हणाली, “मी इंडस्ट्रीत त्यांच्यासारखेकोणीही पाहिले नाही. जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा मी फक्त १४ वर्षांची होते; पण मी असे ऐकले आहे की, त्यांनी इंडस्ट्रीतील लोकांना जवळजवळ एक, कोटी रुपये दिले होते. संजीव कुमार यांच्या निधनानंतर बोनी कपूर आमच्याकडे तीन लाख रुपये घेऊन आले होते. माझ्यावर त्यांचे जास्त कर्ज आहे; पण मी आता हेच परत करू शकते. परंतु, इतर कोणीही कधीही काहीही परत केले नाही.”

संजीव कुमार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तेव्हा ते ४७ वर्षांचे होते. तोपर्यंत त्यांनी १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.