Saroj Khan : बॉलीवूड चित्रपट म्हटलं की हिरो-हिरोइन, सिनेमाचं कथानक, सहायक कलाकार यांच्यासह सिनेमातील गाणी देखील प्रेक्षकांचं तेवढंच मनोरंजन करतात. बॉलीवूड चित्रपटातील सदाबहार गाण्यांच्या आयकॉनिक हूकस्टेप्स सिनेप्रेमींच्या विशेष लक्षात राहतात. गाण्यांच्या हूकस्टेप्सचं सगळं श्रेय नृत्यदिग्दर्शकांना जातं. मनोरंजन सृष्टीत एक काळ असा होता ज्यावेळी कोरिओग्राफर्सकडे दुर्लक्ष केलं जायचं, त्यांना फारसं महत्त्व नव्हतं. अशा कठीण काळात बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या नृत्यदिग्दर्शिका म्हणजेच सरोज खान. त्यांनी आपल्या नृत्यशैलीने भारतीय सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं. मात्र, वैयक्तिक आयुष्यात त्यांना प्रचंड संघर्षाचा सामना करावा लागला होता.

सरोज खान यांनी २०२० मध्ये या जगाचा निरोप घेतला मात्र, आजही त्यांना बॉलीवूडच्या ‘मास्टरजी’ म्हणून ओळखलं जातं. त्यांनी श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूरसह अनेक अभिनेत्रींना नृत्याचे धडे दिले आहेत. सरोज यांचं बालपण अतिशय कष्टात गेलं होतं. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब पाकिस्तानातून भारतात आलं होतं, त्यानंतर १९४८ मध्ये सरोज यांचा जन्म झाला होता.

सरोज यांच्या बालपणी त्यांच्या घरची परिस्थिती फारच बिकट होती. त्यांना एकवेळचं जेवण मिळेल की नाही याचीही शाश्वती नव्हती. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सरोज खान यांनी सांगितलं होतं की, कुटुंबाची परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना जेवणासाठीही संघर्ष करावा लागत होता.

सरोज खान यांनी २०१६ मध्ये ‘कोशिश से कामयाब तक’ या कार्यक्रमात देखील त्यांच्या बालपणाविषयी खुलासा केला होता. घरातील बेताच्या परिस्थितीमुळे सरोज यांनी लहानपणापासूनच काम करण्यास सुरुवात केली होती. कुटुंबाची व भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर होती. यामुळेच त्यांनी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. पण, वयाच्या १० व्या वर्षांपर्यंत त्यांना काम मिळणं बंद झालं होतं. कारण, तेव्हा कोणी बालकलाकार म्हणून काम देत नव्हतं. यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी सरोज यांनी नृत्यांगना म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली.

नृत्याच्या जगात प्रवेश करताच सरोज यांची भेट मास्टर एस सोहनलालशी झाली, जो तिच्यापेक्षा ३० वर्षांनी मोठा होता. सरोज यांचं वय तेव्हा १३ वर्षे होतं आणि एस सोहनलाल ४३ वर्षांचा होता. तो आधीच विवाहित होता आणि त्याला चार मुलं होती. छोट्या सरोजला त्याने आपल्या जाळ्यात अडकवलं होतं आणि तिच्याशी फसवणूक करून लग्न केलं होतं.

सोहनलाल आधीच विवाहित असल्याचं सरोज यांना माहिती नव्हतं. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी एका मुलाला जन्म दिला होता. यानंतर १९६५ मध्ये सरोज खान यांनी सोहनलाल यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. मात्र बाळाचा ८ महिन्यांतच मृत्यू झाला. जेव्हा सोहनलाल यांनी सरोज यांच्या पहिल्या मुलाला आपलं नाव देण्यास नकार दिला, तेव्हा सरोज त्यांच्यापासून विभक्त झाल्या. काही वर्षांनंतर सोहनलाल यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या आजारपणात सरोज पुन्हा त्यांच्या आयुष्यात परतल्या होत्या. याकाळात त्यांना मुलगी झाली, जिचं नाव कुकू असं होतं.

‘डीडी’ला दिलेल्या मुलाखतीत सरोज म्हणाल्या होत्या की, “मला त्यावेळी लग्न म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं. त्याने एके दिवशी माझ्या गळ्यात काळा दोरा बांधला आणि मला वाटलं की मी विवाहित आहे. त्याचं लग्न झालेलं वगैरे मला काहीच माहीत नव्हतं, मी माझ्या पहिल्या मुलाला जन्म दिला तेव्हाच मला त्याच्या लग्नाबद्दल आणि पहिल्या पत्नीबद्दल समजलं होतं.”

दुसऱ्या लग्नाआधी धर्म बदलला

सरोज यांनी १९७५ मध्ये सरदार रोशन खान यांच्याशी लग्न केलं. लग्नाआधी सरोज खान यांनी दुसऱ्या पतीसमोर त्यांच्या पहिल्या पतीपासूनच्या मुलांना दत्तक घेण्याची अट ठेवली होती. सरोज यांच्या दुसऱ्या पतीला ४ मुलं होती आणि त्यांना दोन मुलं होती. सरदार रोशन खानशी लग्न करण्याआधी सिंधी पंजाबी असलेल्या सरोज किशन चंद साधू सिंग नागपाल यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.

याबद्दल डीडीला दिलेल्या मुलाखतीत सरोज खान यांनी सांगितलं होतं की, “मी हिंदू होते आणि माझं नाव सरोज किशन चंद साधू सिंग नागपाल असं होतं. आम्ही सिंधी पंजाबी आहोत. मी माझ्या पतीला भेटले, प्रेमात पडले आणि लग्नाआधी मी धर्मांतर केलं होतं. हा सर्वस्वी माझा निर्णय होता. माझ्या दुसऱ्या पतीने माझ्या मुलांना कधीही बाहेरच्यासारखं किंवा तो त्यांचा पिता नाही असं वाटू दिलं नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सरोज खान यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. श्रीदेवी, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, गोविंदा, सलमान खान, कतरिना कैफ, रवीना टंडन या सगळ्या कलाकारांनी सरोज खान यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यप्रशिक्षण घेतलं होतं.