बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते सतीश कौशिक यांचं ९ मार्चला निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. निधनाच्या एक दिवस आधी कौशिक व्यावसायिक विकास मालू यांच्या दिल्लीतील फार्महाऊसवर करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी झाले होते. मृत्यूआधी त्यांच्याबरोबर काय घडलं? याचा तपास पोलीस करत आहेत. याचदरम्यान विकास मालू यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सतीश कौशिक यांचा मृत्यू झाला नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप विकास मालू यांच्या पत्नीने त्यांच्यावर केला आहे. पत्नीने आरोप केल्यानंतर विकास मालू यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत त्यांची बाजू मांडली होती. आता त्यांनी या प्रकरणाबाबत एएनआयला प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा>> Video : निधनाच्या काही तासांपूर्वी दिल्लीमधील होळी पार्टीमध्ये बेभान होऊन नाचले होते सतीश कौशिक, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

“सतीश कौशिक यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मॅनेजर संतोषला फोन केला. रात्री १२.२०च्या दरम्यान त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु, रुग्णालयाच्या गेटवरच त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास आम्ही एकत्र जेवण केलं होतं. त्यानंतर ते झोपण्यासाठी गेले. तोपर्यंत ते अगदी नॉर्मल होते. ७ मार्चला मुंबईत होळी झाल्यानंतर ८ मार्चला माझ्याकडे मी पार्टी ठेवली होती. सतीश कौशिक व माझे फार जुने संबंध आहेत. ते माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना नेहमी हजेरी लावायचे”, असं विकास मालू यांनी सांगितलं.

हेही पाहा>> Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणचा ऑस्करसाठी ग्लॅमरस लूक, मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष

पत्नीने केलेल्या आरोपांवर उत्तर देत ते म्हणाले, “माझे पत्नीबरोबर वाद असल्याने ती असं वागत आहे. मीडियामधून तिला प्रसिद्धी हवी आहे. यात मी काहीही करू शकत नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. मी जर चुकीचा असेन, तर त्यास सामोरं जाण्यास मी तयार आहे”. दरम्यान, विकास मालूंच्या पत्नीने पोलिसांमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. “विकासने काही वर्षांपूर्वी सतीश यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतले होते. त्याच्याकडे १५ कोटी रुपये परत करण्यासाठी पैसेच नव्हते आणि या वादामधूनच विकासने सतीश यांची हत्या केली” असं त्यांची पत्नी म्हणाली आहे.